मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुभाजकांमध्ये उगवलेले गवत खाण्यासाठी मोकाट गुरे रस्त्यावर येत आहेत. अचानक गुरे समोर आल्याने वाहनचालकांना भरधाव वाहनाला वेसण घालावी लागत आहे. त्यामुळे अनेकदा अपघातही होत आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्याही अधिक आहे. मात्र रस्त्याची विभागणी करणाऱ्या दुभाजकांवर भुरटय़ा वनस्पती आणि गवत उगवल्याने ती खाण्यासाठी अनेक जनावरे रस्ता ओलांडून जात असतात. महामार्गावर गाडय़ांचा वेग अधिक असल्याने मोकाट जनावरे अचानक समोर आल्यास गाडीचा वेग कमी करता येत नाही. त्यामुळे अपघात होऊन वाहनांचे नुकसान होत असून प्रवाशांनाही नाहक जीव धोक्यात घालावा लागतो. त्याशिवाय अनेकदा गुरेही मृत्युमुखी पडत आहेत. अपघात झाल्यास गुरांचे मालक येऊन भरपाई म्हणून पैसे मागतात आणि पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देतात, अशी तक्रार अनेक वाहनचालकांनी केली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या टँकरचीही संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. जर मोकाट जनावरांमुळे राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा ‘गतिरोधक’ या टँकरचा अपघात झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूल करणाऱ्या आयआरबी कंपनीची मोकाट गुरांवर नियंत्रण ठेवण्यासाठीची कोणतीही व्यस्था नाही. राष्ट्रीय महामार्गावर आयआरबी कंपनीचे दोन टोलनाके आहेत. या दोन टोलनाक्यांवर वाहनांकडून टोल वसूल केला जातो, परंतु या मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला जात नाही.

आयआरबी कंपनीची गस्त घालणारी गाडी या राष्ट्रीय महामार्गावर फिरताना पाहायला मिळते. त्यावेळी या मोकाट जनावरांना हुसकावून लावले जाते, परंतु गस्त घालणारी गाडी गेल्यानंतर मोकाट जनावरे परत या राष्ट्रीय महामार्गावर येतात. खूप मोठय़ा संख्येने मोकाट जनावरे असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात शक्य होत नाही. चारोटी येथील आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर साधारणपणे छोटय़ा गाडय़ांचा वेग १०० पर्यंत असतो, अशावेळी मोकाट जनावर रस्त्यावर समोर आल्यास गाडीचा वेग नियंत्रणात आणणे अवघड जाते आणि त्यामुळे अपघात होतो. आम्ही आयआरबी कंपनीला टोल देत असल्याने या कंपनीने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला पाहिजे. अपघात झाल्यानंतर या जनावरांचे मालक या ठिकाणी येऊन अरेरावी करतात आणि पैशांची मागणीही करतात. यामध्ये गाडीचे नुकसानही होते, शिवाय त्या जनावरांच्या मालकाला पैसेही द्यावे लागतात.

-अण्णासाहेब जाधव, प्रवासी, कासा