पावसाळा उंबरठय़ावर आहे. तत्पूर्वी रस्ते सुस्थितीत ठेवणे, खड्डे बुजविण्याची कामे पूर्ण होणे आवश्यक होते. पण फुटकळ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांच्या कामाचे वाटप या राजकारणात गुंतलेल्या प्रशासनाला खड्डे भरण्याकडे या वेळी लक्ष देण्यास वेळ नाही. यापूर्वी धडक मारून आयुक्तांच्या दालनात गेले की, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून ती कामे मार्गी लावण्यात येत होती. मात्र आता तसा प्रकार राहिला नाही. आयुक्तांच्या दालनात धडक मारून गेले तर दुसऱ्या दिवशी बेकायदा बांधकामे, जात प्रमाणपत्राची नस्ती बाहेर निघायची. त्यामुळे नस्ती उठाठेव करण्यापेक्षा शांत राहू, अशीच भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. त्याचा फटका विकासकामांना बसत आहे. पहिल्या पावसात रस्तोरस्ती तयार होणारा चिखल प्रशासनाची भंबेरी उडवणार आहे..

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीत सुमारे साडेतीनशे किलोमीटरचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर आठ महिने रस्ते, पदपथ, गटारे, जलवाहिन्या टाकण्याची कामे महापालिकेकडून सुरू असतात. त्याच वेळी महावितरण, दूरसंचार विभाग व अन्य खासगी आस्थापनांकडून सेवावाहिन्या टाकण्याची कामे सुरू असतात. सिमेंट, डांबरीकरणाचे रस्ते फोडून ही कामे करण्यात येतात. रस्त्याखालील थर उकरून ही सर्व कामे केली जातात. ही कामे केल्याने रस्ते जागोजागी कमकुवत होतात. नागरी सुविधांची ही कामे पुन्हा करताना चांगल्या दर्जाचे सिमेंट, रेती वापरण्यात आले असेल तर ती कामे वर्षांनुवर्षे टिकतात. अशा प्रकारची ही तोडफोड केलेली कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी उत्तमोत्तम दर्जाचे बांधकामाचे साहित्य वापरून तयार करण्यात आली नाही तर त्या रस्ते, पदपथ, भरलेल्या खड्डय़ाची पूर्णपणे वाताहत होते. याचा अनुभव २०१० मध्ये शहरवासीयांनी घेतला होता. रस्त्यात खड्डे आहेत की खड्डय़ात रस्ते अशी त्या वेळी परिस्थिती होती. येत्या पावसाळ्यातही तशाच अवस्थेला नागरिकांना सामोरे जावे लागेल, अशी चिन्हे आहेत.
सर्वसाधारणपणे पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल महिन्यात पालिकेचा अभियंता वर्ग रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाचे प्रस्ताव तयार करून ते मंजुरीसाठी ठेवतात. त्यामध्ये ठेकेदार, अभियंते आणि काही लोकप्रतिनिधी यांचे साटेलोटे असते. निविदा, टक्केवारीची गणिते पूर्ण झाली की मग मे महिन्यात शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे प्राधान्याने पालिकेकडून हाती घेण्यात येतात. पाऊस सुरू झाल्यानंतर काही दिवसांत हे खड्डे उखडले गेले तरी, खड्डे भरण्याची कामे प्रशासनाकडून पूर्ण करण्यात येत होती. या वेळी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांतील अनेक रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडले आहेत. कारण शहर परिसरात सर्वत्र सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. डांबरीकरणाचे रस्ते उखडून तेथे सिमेंटीकरणासाठी खड्डे खणून ठेवले आहेत. अनेक ठिकाणी पदपथांच्या, रस्त्यांच्या कडेला सेवा वाहिन्या टाकण्याची कामे करण्यात आली आहेत. शहरात पाणीटंचाई असल्याने अनेक रहिवाशांनी, सोसायटीचालकांनी पालिकेकडून जलवाहिन्या मंजूर करून घेतल्या. या जलवाहिन्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून बसून घेताना रस्ते फोडण्याचे उद्योग प्लम्बरने केले आहेत. फोडलेले रस्ते माती, आजूबाजूची माती टाकून बुजविण्यात आले आहेत. या रस्त्यावरून सतत वाहनांची ये-जा असल्याने ही सगळी माती, बारीक खडी रस्त्यावर आली आहे. मुख्य जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्यांमधील बिघाड काढण्यासाठी किंवा त्या अन्यत्र स्थलांतरित करण्यासाठी रस्त्यांच्या कडेला पालिकेने मोठे खड्डे खणून ठेवले आहेत. एकदा काम हाती घेतल्यानंतर ते किमान पाच दिवसांत पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र अशा प्रकारचे खड्डे खणून पंधरा ते वीस दिवस उलटून गेले आहेत, तरी या ठिकाणचे काम तसूभरही पुढे गेलेले नाही. वास्तविक ही कामे मे अखेपर्यंत पूर्ण होणे आवश्यक असते. परंतु मे महिना संपायला फक्त सात दिवस बाकी आहेत, पण कामांचा पत्ता नाही. त्यामुळे कामे पूर्ण करताना ठेकेदाराची ओढाताण होत आहे. रविवारी रात्री पावसाने हजेरी लावली. आता कोणत्याही क्षणी पावसाला सुरुवात होईल असे सध्याचे वातावरण आहे. तरीही, पालिका आयुक्त, शहर अभियंता, स्थानिक अभियंता, महापौर, स्थायी समिती सभापती, स्थानिक नगरसेवक आणि ठेकेदारांना याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याने रहिवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. खड्डे भरणे आणि बुजविण्याची कामे भरपावसात करण्यात आली तर ती कामे कमकुवत होतात आणि आठवडाभर दम धरून ती आठव्या दिवसापासून त्या खड्डय़ात वाहने रुतून बसण्यास सुरुवात होते. कल्याणमधील पालिका मुख्यालयाजवळील अशाच एका खड्डय़ात गेल्या आठवडय़ात वाळूचा एक ट्रक भररस्त्यात मातीच्या ढिगाऱ्यात रुतून बसला होता.
जूनच्या पहिल्या आठवडय़ात इंग्रजी शाळा सुरू होतील. पाठोपाठ अन्य शाळा, महाविद्यालये सुरू होतील. शाळांच्या बसची शहरातील ये-जा वाढेल. रिक्षा, खासगी वाहनांची संख्या सुट्टीचा हंगाम संपला की वाढेल. सामानाची वाहतूक करणारी अवजड वाहतूक शहरात होत असते. विशेष म्हणजे पाऊस सुरू झाला की, अनेक विकासक नवीन गृहसंकुलांची कामे सुरू करतात. त्यामुळे अवजड ट्रकची शहरातील वाहतूक वाढते. बेकायदा चाळी, इमारती बांधण्याचा भूमाफियांचा उद्योग १२ महिने २४ काळ सुरू असतो. अशा बांधकामांच्या ठिकाणी अवजड वाहने घिरटय़ा घालत असतात. याशिवाय रात्रीच्या वेळेत चोरीची रेती अन्य भागांत पोहोचविण्याचा उद्योग रेती व्यावसायिकांकडून सुरू असतो. अशा वाहनचालकांना रस्त्यांच्या काळजीपेक्षा आपल्याजवळील चोरीची रेती निश्चित ठिकाणी कशी पोहोचेल याची काळजी असते. दहा चाकांचे अवजड डम्पर अनगड दगड, ओल्या मातीचे ढीग शहराच्या कोपऱ्यात टाकण्यासाठी फिरत असतात. हे ट्रक धनदांडग्या भाईंचे असल्याने याविषयी चकार शब्द काढण्यास कोणी पालिका अधिकारी, नगरसेवक, रहिवासी पुढाकार घेत नसतो. ही सगळी अवजड वाहतूक शहरातील रस्त्यांची आणखी वाताहत करीत असते.
पावसाळा सुरू होण्यास सात दिवस बाकी असताना, पालिकेने अद्याप खड्डे भरण्याची कामे सुरू केली नाहीत. रस्त्यांच्या कडेच्या पट्टय़ा खडी, मातीने भरून गेल्या आहेत. खड्डे भरण्याच्या कामाचे आदेश नाहीत. ही कामे कधी पूर्ण होणार म्हणून रहिवासी अधिकाऱ्यांना विचारणा करतात. तेव्हा त्यांना फक्त चऱ्या भरण्याची कामे सुरू केली आहेत, अशी उत्तरे पालिका अभियंत्यांकडून देण्यात येत आहेत. अभियंत्यांची थकलेली फळी, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना आलेली उदासीनता आणि ग्रामपंचायत, महसूल अधिनियमान्वये काम करणे आणि पालिका कायद्याचा आधार घेऊन प्रशासन चालविणे यामध्ये फरक असल्याने, अधिकारी कितीही हुशार असला तरी प्रत्यक्ष प्रशासनाचा गाडा चालविताना अनेक अडथळे येतात. तोच अनुभव रस्ते डागडुजी, सिमेंट रस्त्यांचा पसारा, पेव्हर ब्लॉकवर डांबर ओतण्याच्या माध्यमातून शहरवासीय घेत आहेत. जागोजागी रस्त्यांवर पडलेले खड्डे, मलबा, मातीचे ढीगले, खोदून ठेवलेले कंबरभर रस्ते ही कामे येत्या आठवडाभरात पूर्ण होणे शक्यच नाही. ती पूर्ण
करण्यात प्रशासनाने टंगळमंगळ केली तर प्रत्येक शहरवासीयांना रस्त्यांवरील खड्डय़ांचे आचके आणि गचके बसणार आहेत. एवढेच नव्हे तर शहरात सतत वाहनचालक म्हणून काम करणारा लवकरच पाठीचा कणा, मणका विकाराचा रुग्ण होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण होईल. २०१० मध्ये खड्डय़ांचे श्राद्ध घालण्याची मोठी स्पर्धा शहरात सुरू होती. मात्र खड्डे जैसे थे होते. शहरवासीय या खड्डय़ांमधून ठेचकळत घर गाठत होते. अशी परिस्थिती किमान पारदर्शक, कणखर बाण्याने काम करीत असल्याचे वातावरण निर्माण करणाऱ्या महापौर राजेंद्र देवळेकर, कार्यतत्पर कार्यक्षम आयुक्त ई. रवींद्रन यांच्या कारकीर्दीत तरी निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा.