ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील नव्या गृहसंकुलांसाठी पोलिसांचा प्रस्ताव

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात नव्याने उभी राहणारी गृहसंकुले तसेच वाणिज्य संकुलांमध्ये सीसी टीव्हीसारख्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेच्या उपाययोजना असल्याशिवाय त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, असा सूचनावजा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी या दोन्ही महापालिकांकडे पाठविला आहे. केंद्र सरकारने आखलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या अंतिम यादीत समावेश व्हावा यासाठी ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने विकास योजनांचा आराखडा तयार केला आहे. त्यात नव्या गृहसंकुलांना सीसी टीव्ही बंधनकारक केले जावे, अशी पोलिसांची सूचना आहे.

स्मार्ट सिटी योजनेमध्ये शहराची सुरक्षा व्यवस्था कशी असावी यासंबंधी चर्चा करण्यासाठी ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठाणे पोलिसांसोबत एक संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पोलिसांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणे तसेच गृहसंकुलांतील सुरक्षा उपाययोजनांसंदर्भात सविस्तर आराखडा सादर केला आहे, अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

नव्याने उभ्या राहणाऱ्या या संकुलांमध्ये सी सी टीव्ही कॅमेरे तसेच सुरक्षेसंबंधीची उपकरणे बसविणे बंधकारक करण्यात यावी, असा पोलिसांचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात शहरांच्या विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद करावी, असे पोलिसांचे म्हणणे असल्याचे सिंग यांनी सांगितले. तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, असेही पोलिसांनी सुचवले आहे.

  • केंद्र तसेच राज्य शासनाची स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. या योजनेत शहराचा विकास करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. ही योजना प्रत्यक्षात उतरविताना शहराची सुरक्षा व्यवस्था कशी असावी, याचाही आढावा घेण्यात येत आहे.
  • ठाणे महापालिकेने यापूर्वी पाण्याचे नियोजन करण्यासाठी नव्या इमारतींना पर्जन्य जलसंधारण योजना सक्तीची केली असून, त्याच धर्तीवर सुरक्षेसंबंधी योजना राबविणे बंधनकारक करण्याचे सुचविण्यात आले आहे. या प्रस्तावावर महापालिकेत विचारविनिमय करण्यात येत आहे.