News Flash

विसर्जनावर कॅमेऱ्यांची नजर

सहा हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

संवेदनशील मार्गावर सीसीटीव्ही, सहा हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त

भाविकांच्या आयुष्यातील विघ्ने दूर सारण्यासाठी वाजतगाजत आलेल्या मंगलमूर्ती मोरयाला मंगलमय वातावरणात निरोप देण्यासाठी अवघे ठाणे तयारी करीत असताना सुरक्षेच्या दृष्टीनेही कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंदा प्रथमच ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांतील संवेदनशील मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून सहा हजारांहून अधिक पोलीस, राज्य राखीव दल तसेच गृहरक्षक जवानांना तैनात करून सुरक्षाव्यवस्थात चोख करण्ण्यात आली आहे.

गणेश विसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. महत्त्वाच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आली असतानाच विसर्जन घाटांवरही महापालिका तसेच नगरपालिकांच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी दिली. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गुरुवारी गणेश विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुकांचा आकडा मोठा असल्यामुळे पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामध्ये ११ पोलीस उपायुक्त, ३० साहाय्यक पोलीस आयुक्त, १५० पोलीस निरीक्षक, ३०० साहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, पाच हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या नऊ कंपन्या, होमगार्डचे सहाशे जवान यांचा समावेश आहे. तसेच आयुक्तालय क्षेत्रात पाच हजार पोलीस मित्र असून त्यांचीही मदत बंदोबस्ताकरिता घेण्यात येणार आहे, असेही सहआयुक्त डुम्बरे यांनी सांगितले.

महिला छेडछाड विरोधी पथक, स्थानिक पोलिसांची गस्तही असणार आहे. याशिवाय, प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचारी ध्वनिमापक यंत्राद्वारे आवाजाची पातळी मोजणार आहेत. त्याआधारे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठिकठिकाणी कृत्रिम तलाव

ठाणे शहरातील तलाव प्रदूषित होऊ नयेत म्हणून महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येते.  रायलादेवी, आंबेघोसाळे आणि उपवन या भागात कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तर पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलावातील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर गणेशमूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय कळवा व मुंब्रा परिसरातही विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. अनिरुद्ध अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे पाचशे स्वयंसेवक, पालिकेचे दीडशे सुरक्षारक्षक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान विसर्जन घाटाच्या परिसरात तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्येक घाटाच्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 2:59 am

Web Title: cctv and tight security for ganesh idols immersion
Next Stories
1 दिव्यातील खड्डय़ांवरून भाजपचे शिवसेनेवर बाण!
2 २० हजार कर्मचाऱ्यांवर संकट
3 कल्याणच्या गणेश घाटावर विजेचा लपंडाव
Just Now!
X