12 December 2018

News Flash

महापौर, आयुक्तांच्या कार्यालयावर नजर

सीसीटीव्हीचे नियंत्रण सुरक्षा विभागाकडे

प्रतिनिधिक छायाचित्र

सीसीटीव्हीचे नियंत्रण सुरक्षा विभागाकडे

ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीमधील अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे मध्यवर्ती नियंत्रण कक्षाला जोडण्याचा निर्णय सुरक्षा विभागाने घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सुरक्षा विभागाने तयार केला असून तो सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. या नियंत्रण कक्षामुळे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या कार्यालयावर सुरक्षा विभागाची नजर राहणार असल्याने यानिमित्ताने महापालिका मुख्यालयात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण त्या कार्यालयातील प्रमुखांकडे असायचे. यापुढे संपूर्ण पालिका मुख्यालयात कोण येतो कोण जातो हे मध्यवर्ती नियंत्रण कक्षातील सुरक्षारक्षकांना पाहता येणार आहे.

पाचपाखाडी येथे पालिका मुख्यालय आहे. त्यामध्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य अधिकारी, शहर अभियंता, उपायुक्त, सर्वच विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेता आणि गटनेत्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयामध्ये अनेक जण विविध कामांसाठी येत असतात. अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये काही वेळेस आंदोलनांचे प्रकार घडतात. या पाश्र्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून महापालिका मुख्यालय इमारतीमधील सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून पालिकेच्या प्रवेशद्वारापासून ते कार्यालयांपर्यंत सुरक्षारक्षकांचे कवच उभारण्यात आलेले आहे. याशिवाय, सर्वच अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचे चित्रीकरण संबंधित कार्यालयांच्या प्रमुखांकडे देण्यात आले आहेत. अशा प्रकारे महापालिका मुख्यालयात शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून एकत्रित चित्रीकरणासाठी महापालिकेचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष नाही. त्यामुळे या सर्वच कॅमेऱ्यांचे चित्रीकरणासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्याचा निर्णय सुरक्षा विभागाने घेतला असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे.

चित्रीकरण कार्यालयात पाहण्याची सोय

मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यासाठी सर्व कॅमेऱ्यांची एकाच नियंत्रण कक्षात जोडणी करण्यात येणार आहे. हे सर्वच कॅमेरे नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार असले तरी महापालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना मात्र त्या कॅमेऱ्यातील चित्रीकरण कार्यालयात पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती सुरक्षा अधिकारी मालवणकर यांनी दिली.

 

First Published on January 13, 2018 3:27 am

Web Title: cctv camera in thane municipal corporation