रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस नाही, हे पाहून सिग्नल मोडून पळण्याचा विचार करत असाल तर सावधान! दंडाची पावती थेट तुमच्या घराच्या पत्त्यावर पोहोचेल!.. येत्या काळात ठाण्यातील रस्त्यांवर बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची तसेच वाहनांची छबी टिपून त्यांना त्यांच्या घरी जाऊन दंड आकारण्याची योजना ठाणे वाहतूक पोलिसांनी आखली आहे. यासंदर्भात एक अभ्यासगट नेमण्यात आला असून त्यानंतर ही योजना कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती ठाणे शहर पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.
ठाणे शहर आणि आसपासच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या मोठमोठय़ा गृहसंकुलांमुळे शहरातील वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, त्या तुलनेत शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाही. मुंबई-नाशिक आणि ठाणे-अहमदाबाद हे दोन्ही महामार्ग ठाणे शहराला भेदून जातात. माजीवाडा भागात दोन्ही महामार्ग एकमेकांना जोडले गेले आहेत. येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्याचा परिणाम शहरातील अंतर्गत रस्त्यांवर दिसून येत आहे.
एकीकडे वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढत असतानाच नियमभंग करून वाहन चालवणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. भरधाव वेगाने गाडी चालवणे, सिग्नल मोडणे, हेल्मेटविना दुचाकी चालवणे अशा प्रकारांमुळे शहरांतर्गत रस्त्यांवर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर बेशिस्त वाहनचालकांवर वचक बसवण्यासाठी आणि वाहतूक यंत्रणेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने विविध उपाययोजना आखल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने नियम मोडणाऱ्या वाहनांची चित्रे टिपून त्यावरील क्रमांकाच्या मदतीने वाहनमालक वा चालकाला दंडाची पावती घरपोच दिली जाणार आहे. याकरिता ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी शहरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव महापालिकेला सादर केला आहे.
या कॅमेऱ्यांतील दृश्ये दाखवणारी ‘व्हिडीओ वॉल’ वाहतूक नियंत्रण शाखेत बसवण्यात येईल व तेथून बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
वाहतूक शाखेची योजना
’तीन हात नाका, नितीन जंक्शन, कॅडबरी, तत्त्वज्ञान विद्यापीठ, हायपर सिटी येथील महत्त्वाच्या जंक्शनसह शहरातील काही महत्त्वाचे रस्ते आणि चौकात सुमारे ४० सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी पालिकेपुढे मांडला आहे.
’ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वाहतूक शाखेचा हा प्रस्ताव उचलून धरला असून यंदाच्या अर्थसंकल्पात ‘स्मार्ट सिटी सव्‍‌र्हेलन्स’ योजनेअंतर्गत शहरात सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणण्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
’सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग करत परदेशातील काही देशांच्या धर्तीवर बेशिस्त चालकांना दंडांची पावती घरपोच पाठविता येऊ शकते का, याची चाचपणी वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. यासाठी एक अभ्यासगट नेमण्यात आला आहे.
नीलेश पानमंद, ठाणे

ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांत सुमारे ४० सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव महापालिकेला सादर केला असून या प्रस्तावात या सर्व सीसी टीव्ही कॅमेऱ्याची मुख्य ‘व्हिडीओ वॉल’ वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात बसविण्याचे सुचविण्यात आले होते. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच गैरप्रकार, गुन्हेगारीलाही आळा घालण्यासाठी मदत होऊ शकते. परदेशात अशाच प्रकारे वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येतो. त्याच धर्तीवर ही योजना राबविण्याचा मानस आहे.
   – डॉ. रश्मी करंदीकर,     पोलीस उपायुक्त – ठाणे वाहतूक शाखा