कल्याण पश्चिमेतील चॉम्स स्टार सोसायटीमधील घरफोडीचा उलगडा झाला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघा चोरटय़ांना जेरबंद करण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. चोरीस गेलेल्या ३ लाखांच्या मालापैकी एक लाख ५५ हजारांचा माल पोलिसांच्या हाती लागला आहे. जीतु कदम व सईस शेख असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कल्याण पश्चिमेतील बैलबाजार येथे १० जानेवारीला घरफोडीची घटना घडली होती. विशाल पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी घरातील चांदीचे देव, चमचा, सोन्याची अंगठी, मंगळसूत्र, घडय़ाळ आदी ३ लाख १७ हजार २०० रुपयांचा माल चोरून नेला होता. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बाजारपेठ पोलिसांनी रईस नियाजअली मोहम्मद शेख (२६) व जीतु राजेश कदम (२०) यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांना एक लाख ५५ हजारांचा माल सापडला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. जाधव, एस. बी. मोरे, एस. एल. पवार आदींनी तपास कार्यात भाग घेतला.