संख्येने कमी परंतु बुद्धीने तल्लख, अशी ओळख असणाऱ्या पारशी बांधवांच्या नूतन वर्ष अर्थात ‘नवरोज’ची रंगत मंगळवारी ठाण्यातील चरई परिसरातील पारशी कॉलनी येथे पाहायला मिळाली. घराच्या दाराला लावलेली तोरणे, घरासमोरील रांगोळ्या, अग्यारीतील शांततामय प्रार्थनेची दृश्ये पारशी नवीन वर्षांची साक्षच देत होती.
ठाणे शहरातील विविध परिसरात सुमारे ३०० पारशी बांधव राहतात. ठाण्यातील अग्यारी लेन परिसरातील पटेल अपार्टमेंट येथे ८० घरे, चरई परिसरातील अहुजा अपार्टमेंटमध्ये ५० तर रघुनाथनगर येथे पारशी बांधवांची १२ घरे आहेत. याशिवाय ठाण्यातील अन्य परिसरातही पारशी बांधवांचे वास्तव्य आहे. ‘नवरोज’ हा पारशी बांधवांच्या नवीन वर्षांचा पहिला दिवस. पारशी बांधवांच्या या नवीन वर्षांची लगबग नवरोज आधी दहा दिवसांपासूनच सुरू होते. नवरोज आधीच्या या दहा दिवसांना ‘मुक्ताद’ असे म्हटले जाते. परंतु नवरोज आधीचे पाच दिवस पारशी बांधवांसाठी अधिक महत्त्वाचे असतात. या दिवसांमध्ये कुटुंबातील दिवंगत व्यक्तींची आठवण काढून इतर कुटुंबियांकडून त्याविषयी दु:ख व्यक्त करण्यात येते. नवरोजच्या आदला दिवस म्हणजे पतेती. पतेतीच्या दिवशी पारशी बांधव देवाची प्रार्थना करतात आणि केलेल्या चुकांविषयी क्षमा मागतात. पतेतीनंतर उजाडणारा दिवस म्हणजेच ‘नवरोज’.
मराठमोळी संस्कृतीला साजेसे अशा वाटणाऱ्या रांगोळ्या पारशी बांधव आपल्या घराबाहेर काढतात. पारशी बांधव आपल्या घराच्या दाराला तोरणही बांधतात. शेवया, ड्रायफ्रुट यांचे मिश्रण असणारा असा पोषक नाश्ता पारशी बांधवांच्या घरी करण्यात येतो. त्यानंतर अंघोळ करून, नवीन कपडे परिधान करून पारशी बांधव त्यांच्या धर्मस्थळात म्हणजेच ‘अग्यारी’त किंवा ‘आतश बेहराम’ येथे जातात. ठाणे जिल्ह्य़ातील आसपासच्या परिसरात अग्यारी नसल्यामुळे ठाणे शहरातील टेंभी नाका येथील अग्यारीत अन्य शहरातून पारशी बांधव या दिवशी जमतात. त्यामुळे मंगळवारी दिवसभर टेंभी नाका परिसर पारशी समाज बांधवांनी गजबजलेला होता. पारशी बांधवांच्या दुपारच्या जेवणात माश्याचा समावेश आग्रहाने असतो. संध्याकाळी बहुतांशी पारशी बांधव मुंबईत पारशी नाटक बघण्यासाठी जातात. काही पारशी बांधव नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या नातेवाईंकाकडे जातात.

‘नवरोज’ हा पारशी वर्षांचा पहिला दिवस असून पतेती हा नूतन वर्षांच्या आधीचा दिवस आहे. पतेती हा दिवस पारशी बांधवांच्या दु:खाचा दिवस असतो. परंतु दुर्देवाने इतर धर्मीय आणि काही पारशी बांधव एकमेकांना ‘पतेतीच्या हार्दिक शुभेच्छा’ देऊन हा दिवस साजरा करतात
– केरसास्प पटवा, ठाणे</p>