बदलापूर नगरपालिका सध्या अनेक घोटाळे व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे गाजत आहे. यात नव्यानेच लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झालेला टिडीआर घोटाळा, बीएसयुपी योजनेअंतर्गत दिलेला मोबीलायझेशन अ‍ॅडव्हान्स, घरकुल घोटाळा, निकृष्ट दर्जाचे रस्ते यांमुळे बदलापूर पालिकेची प्रतिमा मलिन झाल्याने रक्षाबंधनाचे औचित्य साधून राष्ट्रवादीने पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना या घोटाळ्यापासून पालिकेचे रक्षण करण्यासाठी रक्षाबंधन आंदोलन केले. मात्र मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय अधिकारी नितीन शिंदे यांना घोटाळ्यांपासून बचावासाठीची राखी बांधण्यात आली.बदलापूर नगरपालिकेतील अभियंते व २०१० ते २०१३ मध्ये कार्यरत असणारे मुख्याधिकारी व नगररचनाकार यांच्यावर व तत्कालिन नगराध्यक्ष यांच्यावर टीडीआर (विकास हक्क हस्तांतरण) प्रकरणी घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बीएसयुपी योजनेला देण्यात आलेला मोबीलायझेशन अ‍ॅडव्हान्स, शहरातील निकृष्ट दर्जाचे रस्ते यांमुळे पालिकेची प्रतिमा मलिन झाल्याने सध्या पालिकेतील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच, बीएसयुपी योजनेला देण्यात आलेल्या मोबीलायझेशन अ‍ॅडव्हान्स प्रकरणी राज्याच्या नगरविकास मंत्र्यांकडे येत्या आठवडय़ात सुनावणी होणार असून त्यात अनेक नगरसेवकांचे भवितव्य पणाला लागले आहे. या घोटाळ्यांमुळे बदलापूर पालिकेचे लोकप्रतिनिधी व अधिकारी, अभियंते यांचे नाव सध्या गाजत आहे. याचाच फायदा घेत राष्ट्रवादीने मुख्याधिकाऱ्यांना यापुढे घोटाळे होऊ नयेत व घोटाळ्यांपासून पालिकेचे संरक्षण करावे म्हणून त्यांना राखी बांधून रक्षाबंधन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्याधिकारी नसल्याने त्यांनी प्रशासकीय अधिकारी शिंदे यांना राखी बांधून निवेदन दिले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या घोटाळ्यांचा निषेध केला.