रंगांची उधळण करीत होळीनंतरचा धुळवडीचा दिवस अगदी उत्साहात साजरा करण्याची परंपरा सर्वत्र आहे, त्याला ठाणेही अपवाद नाही. मात्र काही ठिकाणी नैसर्गिक रंग वापरून रंगपंचमी साजरी होते, तर काही जण पर्यावरणाचे भान ठेवत ओले रंग न वापरता कोरडय़ा रंगांची उधळण करतानाचे चित्र ठाण्यात पाहायला मिळते. यंदा मात्र राज्यात भीषण दुष्काळ आहे, तसेच ठाणेकरांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्यामुळे यंदाची धुळवड ही पाण्याविनाच साजरी होईल, किंबहुना सामाजिक जाणिवेचे भान ठेवत ठाणेकरांनीदेखील यंदा रंगपंचमी साजरी न करण्याचे ठरविले तर खऱ्या अर्थाने ठाण्याची पर्यावरणाभिमुख ठाणे असलेली ओळख सार्थ ठरेल. ठाणे शहरासह कळवा, मुंब्रा आदी परिसरांत प्रत्येक आठवडय़ाच्या गुरुवारपासूनच पाण्याचे शटडाऊन सुरू असते. त्यामुळे शुक्रवार हा तर ठाणेकरांचा पाण्याविनाच असतो. यंदा धुळवडदेखील गुरुवारीच (२४ मार्च) आहे. ठाणे शहरासह कळवा, मुंब्रा परिसरात एमआयडीसी, स्टेम तसेच ठाणे महापालिकेचा पाणीपुरवठा बंद असतो. तसेच ठाण्यातील लुईसवाडी, तीन हात नाका परिसरातील सोसायटय़ांनीही होळी न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रत्येक ठाणेकरांनी घेणे आवश्यक असून यामुळे प्लॅस्टिक पिशव्या, फुगे यांनादेखील निश्चितच आळा बसेल. होळीच्या आठवडाभर आधीपासूनच लहान मुले पिशव्यांच्या वापर सुरू करतात, त्यामुळे होळी, धुळवडीच्या दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी प्लॅस्टिक पिशव्या पाहायला मिळतात.
पाणीटंचाईमुळे ठाणेकरांनी होळी न खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे यंदाची होळी ही पर्यावरणाभिमुख साजरी होईल.
परंतु याचप्रमाणे इतरही उत्सव पर्यावरणाभिमुख साजरे करण्याची गरज आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सणसुद्धा जर पर्यावरणाभिमुख साजरे झाले तर खऱ्या अर्थाने उत्सवांचे पारंपरिक महत्त्व टिकून राहील. राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळेच पाणीबचतीबाबत महापालिकेच्या वतीनेही जनजागृती केली जात आहे. शहरातील तरणतलावांचे पाणीदेखील बंद करण्यात आले आहे, तसेच शहरातील प्रत्येक भागात बोअरवेल खोदण्यात येणार असून त्या माध्यमातून इतर वापरांसाठी बोअरवेलचे पाणी वापरावे, असेही महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. ठाणे शहर जरी विकसित होत असले तरी या शहरात आजही अनेक ठिकाणी विहिरी अस्तित्वात आहेत. या विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, ते पाणी पिण्यायोग्य असल्यास पंप लावून हे पाणी वापरण्यावर भर दिला जाणार आहे. ठाण्यात अनेक सरकारी, निमसरकारी तसेच खासगी कार्यालये आहेत, सरकारी- निमसरकारी कार्यालयांत अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दररोज हजारो नागरिक येत असतात, तसेच अनेक कार्यालयांत भेटीसाठी आलेल्या नागरिकांना पाणी तसेच चहा दिला जातो. मात्र ग्लासातून दिलेले पाणी हे संपतेच असे नाही, तसेच ग्लासात अर्धे राहिलेले पाणी हे दुसऱ्यास न देता ते फेकले जाते. तसेच चहासाठी वापरण्यात आलेल्या कपबशा विसळण्यासाठी बरेच पाणी लागते, त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर उपाय म्हणून भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांना जर ग्लासाऐवजी बाटलीतून पाणी दिले तर ते निश्चितच दोन ते तीन जण पाणी पिण्यासाठी वापरू शकतात. तसेच कपबशीऐवजी कागदी ग्लास वापरले तर बऱ्याच अंशी पाण्याचा वापर कमी होण्यास मदत होईल. पाणीबचत ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने यासाठी हातभार लावणे गरजेचे आहे.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब