मुद्दा मतदारांचा : सीमेंट रस्त्यांची ‘धूळ’धाण
शहरातील रस्ते मजबूत असावेत तसेच खड्डय़ांचे शुक्लकाष्ठ कायमचे मार्गी लागावे यासाठी शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेला सीमेंट रस्ते कामांसाठी २७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पहिल्या टप्प्यात चार सीमेंट रस्त्यांची कामे करण्याचे ठरले. कल्याणमधील महत्त्वाचे वर्दळीचे दुर्गामाता चौक ते भवानी चौक, आधारवाडी ते गंधारे, पूर्व भागातील पुना लिंक रस्ता, डोंबिवलीतील बाजीप्रभू चौक ते गावदेवी (जकात नाका) रस्त्यांचा समावेश होता. या कामांसाठी शासनाने १०२ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. चार वर्षांपूर्वी सीमेंट रस्त्यांची कामे सुरू झाली खरी, मात्र अजूनही यापैकी काही कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे.
ही कामे करताना ठेकेदारांना रस्त्यांलगतच्या बीएसएनएल, महावितरण, जल, मलवाहिन्या यांचे अडथळे येऊ लागले. ही कामे कोणी करायची म्हणून प्रश्न निर्माण झाला. निविदेमध्ये सेवा वाहिन्या स्थलांतर करण्याची जबाबदारी कोणाची हा विषय नव्हता. त्यामुळे ठेकेदारांनी ही कामे करण्यास नकार दिला. या कामांसाठी सुमारे ५० कोटींहून अधिक रक्कम लागणार होती. सीमेंट रस्ते कामांमधील सेवा वाहिन्या स्थलांतर हा महत्त्वाचा विषय असल्याने या कामांसाठी स्वतंत्र एजन्सी नेमावी लागेल याची जाणीव महापालिकेला झाली. ५० कोटीच्या खर्चासाठी महापालिकेने शासनाकडे धाव घेतली. सुरुवातीला शासनाने नकार दिला. निविदेत ही अट का नाही टाकली म्हणून शासनाने पालिकेला खडसावले. नंतर जुळवाजुळव करून हा निधी उपलब्ध करण्यात आला. काही ठिकाणी अतिक्रमणे, खासगी मालकांनी रस्ते कामांना विरोध केला. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जी कामे किमान दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, ती कामे आज चार वर्षे पूर्ण झाली तरी रडतखडत चालू आहेत. एकेका कामांना चार ते पाच वेळा मुदतवाढी देऊन कामे पूर्ण करून घेण्यात येत आहेत.
दुसऱ्या टप्प्यात कल्याण, डोंबिवलीतील १९ रस्ते सीमेंट कामांसाठी प्रस्तावित होते. सीमेंट रस्ते पाहिल्यानंतर सुंदर मार्गिकांचे चित्र आपल्यापुढे सहज उभे राहते. पण, कल्याण, डोंबिवलीतील सीमेंट रस्ते पाहिले तर रस्त्यांना कामे करतानाच भेगा पडल्या. काही ठिकाणी रस्ते खचले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सेवा वाहिन्यांचे जाळे. २३ रस्त्यांपैकी पाच ते सहा रस्त्यांचे सीमेंटीकरण पूर्ण झाले आहे. बाकी सर्व रस्ते ठेकेदाराचा वाढलेला खर्च, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, जमीनमालकांच्या हरकती यांच्या जंजाळात अडकले आहेत.

’सीमेंट रस्ते – २३
’खर्च – २७४ कोटी
’ठेकेदारांना दिलेली देयके- ८५ कोटी २५ लाख

मालदार उमेदवार
रमेश सुदाम जाधव (माजी महापौर)
२००८ ते २०१० या कालावधीत महापौर असलेले रमेश जाधव यंदा ते ९६ क्रमांकाच्या जाईबाईनगर या प्रभागातून निवडणूक लढवीत आहेत.
’व्यवसाय – व्यापर व शेती
’शिक्षण – ११ वी (उत्तीर्ण राजस्थान आर्य कॉलेज वाशीम, ९४-९५)
’वार्षिक उत्पन्न – ६ लाख ५८ हजार
’जंगम मालमत्ता – २१ लाख ७६ हजार ९५०
’पत्नीची मालमत्ता – २ लाख १ हजार ९००
(रोख रक्कम, बँक ठेवी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, वाहन, एलआयसी पॉलिसी)
’वाहन – रमेश जाधव यांच्या नावावर ऑटोरिक्षा हे एकमेव वाहन आहे.
’जंगम मालमत्ता – १७ लाख ८५ हजार (शेतजमिनी -चिखली, चिचवली येथे. काही सदनिका नावावर.)
वैजयंती शिरीष घोलप (माजी महापौर)
२०१०-१३मध्ये महापौरपद भुषविलेल्या घोलप या यंदा २६ क्रमांकाच्या होली क्रॉस शाळा प्रभागातून निवडणूक लढवीत आहेत.
’ व्यवसाय – सेवानिवृत्त (गृहिणी)
’ शिक्षण – बी. कॉम. (बिर्ला महाविद्यालय १९८९)
’ गुन्हे – वैजयंती घोलप यांच्यावर सरकारी कामात अडथळा, अनधिकृत जमाव जमवणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे दाखल आहेत. ही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.
’ राजकीय गुन्हे – महात्मा फुले पोलीस हद्दीतील तीन गुन्ह्य़ांतून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
’ एकूण वार्षिक उत्पन्न – २ लाख १२ हजार रुपये
’ जंगम मालमत्ता – १० लाख ४६ हजार ७२५
’ स्थावर मालमत्ता ३२ लाख ७३ हजार १४९