अर्धवट काम झालेल्या आधारवाडी रस्त्यावर शिक्षणमंत्र्यांसाठी मलमपट्टी

वर्षभरापासून सुरू असलेल्या आधारवाडी सीमेंट रस्त्याचे काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक नसल्याने वाहनचालकांमध्ये शिस्त राहिलेली नाही. रस्त्याच्या कडेला महावितरणची वाहिनी टाकण्याची कामे सुरू आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पट्टय़ा पेव्हर ब्लॉक किंवा डांबरीकरण केले नसल्याने आधारवाडी रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली आहे. त्यामुळे इथून ये-जा करणारे रिक्षाचालक, शाळा बसचालक आणि पादचाऱ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

गुरुवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे आधारवाडी भागातील काही रस्त्यांवरून जाणार असल्याने घाईघाईत बुधवारी या रस्त्यावर डांबर ओतण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती या भागातील रहिवाशांनी दिली.

आधारवाडी तुरुंग परिसरातील श्री कॉम्पलेक्स भागात महावितरण कंपनीतर्फे भुयारी वीजवाहिन्या टाकण्याची कामे गेल्या महिन्यापासून सुरू आहेत.

ही कामे पाऊस सुरू झाला तरी पूर्ण करण्यात आली नाहीत. मोहन रिजन्सी ते डॉन बॉस्को शाळेच्या जवळ या वाहिन्या रस्त्याच्या कडेला उघडय़ावर दिसतात. त्यावर आता माती, दगड टाकून त्या झाकण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांवरील माती पावसामुळे रस्त्यावर वाहून येते.

पाऊस असला की या मातीचा चिखल होत आहे. या चिखलामुळे रहिवाशांना रस्त्यावरून ये-जा करणे शक्य होत नाही. दुचाकी वाहने या चिखलावर घसरून पडतात, असे या भागातील रहिवासी अरविंद बुधकर यांनी सांगितले.

शाळा सुरू झाल्यामुळे या रस्त्यांवरून शालेय बसची वर्दळ वाढणार आहे. रस्त्यांची कामे अपूर्ण असल्याने आधारवाडी रस्ता वाहतूक कोंडीत अडकण्याची भीती आहे. रॉयल रिजन्सी ते जेल देवळा भागातील रस्ता पूर्ण करण्यात आला नाही. पावसाळा सुरू होतोय हे माहिती असूनही पालिका प्रशासन रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन का करीत नाही.

महावितरणने वाहिन्या टाकण्याची कामे मे महिना अखेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. या सगळ्या व्यवस्थेमध्ये करदात्यांच्या पैशांचा नाहक चुराडा केला जातो, असे रहिवासी भास्कर रेणुके व विलास पाटील यांनी सांगितले.

आधारवाडी परिसरातील रस्ते व अन्य समस्या कायम राहिल्या. या भागात सतत वाहतूक कोंडी होऊ लागली तर मात्र या भागातील रहिवासी संघटितपणे पालिकेवर मोर्चा काढतील, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

पालिकेला सर्वाधिक महसूल देणारा भाग म्हणजे आधारवाडी परिसर आहे. या भागातील रहिवाशांना त्यांनी भरलेल्या शंभर टक्के करापैकी किमान ५० टक्के सार्वजनिक सुविधा तरी पालिकेने उपलब्ध करून द्याव्यात. दोन वर्षांपासून आधारवाडी परिसरातील रस्ते प्रशासनाला वाहतूक कोंडीमुक्त करता आले पाहिजे.

अरविंद बुधकर, रहिवासी, आधारवाडी