उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाची मागणी

डोंबिवली : कर्जत, कसारा ते डोंबिवली, कल्याण, ठाणे परिसरातून मुंबईत सरकारी, खासगी आस्थापनांमध्ये नोकरीला जाणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. अत्यावश्यक सेवा लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  या वाढत्या गर्दीमुळे महिलांच्या डब्यात सामाजिकअंतराचे पालन करणे शक्य होत नसल्याने महिलांसाठी मध्य रेल्वेने नियोजित वेळेतील महिला विशेष लोकल फे ऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी उपनगरी रेल्वे सल्लागार समितीचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे.

पश्चिम रेल्वेनेप्रमाणे मध्य रेल्वेने देखील  महिला विशेष लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.   आस्थापनांमधील उपस्थिती वाढविण्यात आल्याने मध्य रेल्वेच्या कर्जत, कसारा, आसनगाव, टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि पुढील स्थानकांवरून महिला नोकरदारवर्ग अधिक संख्येने मुंबईत नोकरीसाठी येत आहे.  बँक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दीत वाढ झाली आहे.  नियमांचे पालन करणे शक्य होत नाही.

मध्य रेल्वेने दैनंदिन अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त ६८ वाढीव लोकल फे ऱ्या वाढविल्या आहेत. हे करताना महिला विशेष लोकल फे ऱ्यांचा विचार होणे आवश्यक आहे. दैनंदिन लोकल प्रवाशांची संख्या तीन ते सव्वातीन लाख झाली आहे. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या अधिक आहे. महिला प्रवाशांची, त्यांच्या कुटुंबीयांची करोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील सुरक्षिततेचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने महिला विशेष लोकल फेऱ्यांचे नियोजन करून महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी मागणी शेलार यांनी प्रशासनाकडे केली आहे. अनेक महिला प्रवासी मध्य रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क करून महिला विशेष लोकल सुरू करण्याची मागणी करीत आहेत.