कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या १०० वर्षे जुना पत्री पुलाच्या पाडकामासाठी येत्या रविवारी, १८ नोव्हेंबर रोजी सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून केले जात आहे. या ब्लॉकमुळे १४० लोकल फेऱ्या रद्द होतील. विशेषत: मुंबई ते नाशिक, पुणे दरम्यानच्या मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत.

अंधेरी स्थानकातील गोखले उड्डाणपुलावरील पादचारी मार्गिका कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेने आपापल्या हद्दीतील उड्डाणपूल व पादचारी पुलांची तपासणी हाती घेतली.  कल्याण येथील पत्रीपूलही धोकादायक असल्याचे तपासात निदर्शनास आले आणि जुलै २०१८ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

रेल्वे हद्दीतच येत असलेला पत्रीपूल पाडण्यासाठी मेगाब्लॉक घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मध्य रेल्वेकडून १८ नोव्हेंबर रोजी म्हणजेच येत्या रविवारी ब्लॉकचे नियोजन केले जात आहे. सकाळी ८ किंवा ९.३० वाजल्यापासून हा ब्लॉक असेल. तसा प्रस्ताव तयार करून रेल्वे बोर्डाकडे आधीच मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याची मंजुरी दोन दिवसांत येताच मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक घेताना जवळपास १४० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील तर ४० मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळा, त्यांचा थांबा व मार्ग बदलण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई ते नाशिक, पुणे दरम्यानच्या सहा गाडय़ाही रद्द केल्या जातील. त्यामुळे लोकल प्रवाशांबरोबरच मेल-एक्स्प्रेस गाडय़ांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेही हाल होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी काही विशेष लोकल फेऱ्याही चालविण्यात येणार आहेत.