News Flash

रेल्वे रखडपट्टीचा राग तिकीट तपासनीसांवर

मध्य रेल्वे मार्गावर तिकीट तपासनीसांना मारहाण होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

प्रवाशांकडून अरेरावी, धक्काबुक्की, धमकावण्याच्या प्रकारांत वाढ

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावर विविध कारणांमुळे लोकलची रखडपट्टी सुरू असल्याचा फटका आता तिकीट तपासनीसांना (टीसी) बसू लागला आहे. मध्य रेल्वेचे वेळापत्रक सातत्याने बिघडत असल्यामुळे प्रवाशांचा जागोजागी उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. या रागाचा फटका सहन करावा लागत असल्याचे मध्य रेल्वेमार्गावर कार्यरत असणाऱ्या अनेक तिकीट तपासनीसांनी प्रशासनाला कळविल्याचे वृत्त आहे. कर्जत-कसारा या मार्गावरील रेल्वे स्थानकामध्ये तर तिकीट तपासनीसांना धमकावण्याचे प्रकारही सातत्याने घडत असून यासंबंधीच्या तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर तिकीट तपासनीसांना मारहाण होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका महिला टीसीला अंबरनाथ रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनीच बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. किंग सर्कल आणि वांद्रे रेल्वे स्थानकांत टीसींना रेल्वे रुळांवर ढकलण्याचे प्रकार घडले आहेत. मागील चार ते पाच महिन्यांमध्ये या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. या घटनांमुळे मध्य रेल्वे मार्गावर तिकीट तपासणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासंबंधी काही तिकीट तपासनीसांनी प्रशासनाकडे आपले अनुभव नोंदविले असून

मध्य रेल्वेचे वेळापत्रक बिघडत असल्याने त्याचा फटका आम्हाला बसत असल्याचे सांगितले आहे. रेल्वे प्रशासनाने प्रत्येक तिकीट तपासनीसाला दररोज २५ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्याचे लक्ष्य दिले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा दबाव आणि प्रवाशांची अरेरावी या दुहेरी कोंडीत आम्ही सापडत आहोत, असे मत काही कर्मचाऱ्यांनी नोंदविले आहे.

धमक्यांमुळे बेजार

ठाण्यापुढील रेल्वे स्थानकात अनेकदा प्रवाशांकडून धमकावले जात असल्याचा अनुभव काही टीसींनी सांगितले आहेत. रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने अनेक प्रवासी तिकीट काढत नाहीत. अनेक प्रवाशांना विनातिकीट पकडल्यानंतर लोकल वेळेत मिळत नसल्याने तिकीट काढत नसल्याचे ते सांगतात, असे एका टीसीने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

रेल्वेसेवा उशिराने धावत असल्याने त्याचा राग संबंधित प्रवाशाच्या मनात निर्माण झालेला असू शकतो. त्यातच तिकिटाची विचारणा केल्यावर या प्रवाशाकडून तो राग शाब्दिक अथवा शारीरिक हल्ल्याद्वारे व्यक्त होत आहे. जनजागृती करून अशा प्रकारांवर आळा घालणे गरजेचे आहे.

– डॉ. यश वेलणकर, मानोसोपचारतज्ज्ञ

तिकीट तपासनीसांशी अरेरावी करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यासोबत रेल्वेत तिकीट तपासनीसांची भरती करणेही गरजेचे आहे. आम्हा रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षा दिली गेली नाही, तर काम बंद आंदोलन करू.

– प्रवीण वाजपेयी, सरचिटणीस, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ.

चार महिन्यांतील  हल्ल्याच्या घटना

’ २८ ऑक्टोबर- बामणडोंगरी रेल्वे स्थानकात प्रवाशाने महिला तिकीट तपासनीसास रुळांवर ढकलले.

’ १३ नोव्हेंबर – उल्हासनगर रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीसावर हल्ला

’ २४ डिसेंबर- किंग सर्कल स्थानकात तिकीट तपासनीसाला रेल्वे रुळावर ढकलले

’ २४ डिसेंबर- वांद्रे रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीसाला रुळांवर ढकलले

’ २६ डिसेंबर- अंबरनाथ रेल्वे स्थानकात महिला रेल्वे तिकीट तपासनीसाला मारहाण.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 5:15 am

Web Title: central railway passenger anger on ticket checker for train late zws 70
Next Stories
1 वसई किल्लय़ातील गैरप्रकारांकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष
2 येऊरमध्ये उपाहारगृहाच्या परवान्यावर मद्यपाटर्य़ा
3 कोंडीमुक्तीचा संकल्प!
Just Now!
X