ऐन पावसात प्रवाशांची पळापळ; थांबा नावापुरता असल्याची टीका

मुसळधार पावसामुळे मंगळवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असतानाच रेल्वे प्रशासनाची अनास्था आणि डोंबिवलीकर प्रवाशांची मुजोरी याने वैतागलेल्या दिव्यातील प्रवाशांचा संताप उफाळून वर आला. कसाऱ्याहून मुंबईकडे निघालेली जलद लोकल दिवा स्थानकात थांबली असतानाही गाडीमधील प्रवाशांनी लोकलची दारे न उघडल्याने दिव्याहून या गाडीत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांच्या संतापाला पारावार उरला नाही. ही परिस्थिती रोजच घडत असतानाही रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशी संघटनांनी केला आहे.

प्रवासी संघटनांच्या मागणीनंतर गेल्या डिसेंबर महिन्यापासून दिव्यात काही जलद गाडय़ांना थांबा देण्यात आला असला तरी गाडी डोंबिवलीहूनच तुडुंब भरून येत असल्याने दिव्यातील फार कमी प्रवाशांना जलद गाडीत प्रवेश मिळतो. त्यामुळे जलद गाडी थांब्याचा दिव्यातील प्रवाशांना फारसा उपयोग झालेला नाही. त्यामुळे दिव्यातील प्रवाशांच्या मनात असंतोष आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी गाडय़ा विलंबाने धावत असल्याने अनेक प्रवाशांनी जलद लोकल पकडण्यासाठी त्या फलाटावर धाव घेतली. सकाळी ८.०८ची कसाऱ्याहून मुंबईला जाणारी लोकल दिवा स्थानकात आली. पावसामुळे प्रवाशांनी लोकलचे दार बंद केले असावे असे प्रथम दिवेकरांना वाटले. मात्र लोकल थांबूनही आतील प्रवाशांनी दार उघडले नाही. लोकांनी दार ठोठावले. मात्र आतील प्रवाशांनी दार उघडलेच नाही, अशी प्रतिक्रिया सिद्धेश धुरी या प्रवाशाने दिली. ‘एरवी आम्ही धिम्या लोकलनेच प्रवास करतो, मात्र आज लोकलचा गोंधळ असल्याने जलद गाडीने जाण्याचे ठरविले. मात्र या लोकलचे दारच प्रवाशांनी बंद ठेवले,’ असे अन्य एका प्रवाशाने सांगितले. लोकलच्या मधल्या डब्याचे तीनही दरवाजे प्रवाशांनी बंद ठेवले होते.

अखेर काही प्रवाशांनी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांना दूरध्वनी करून या घटनेची माहिती दिली. आदेश भगत यांनी दिवा रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात जाऊन तिथे या लोकलचे सीसीटीव्ही चित्रीकरण दाखविण्याची मागणी केली. मात्र सीसीटीव्हींचे काम सुरू असल्याने ते सध्या उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांच्या उद्रेकाविषयी त्यांना सांगितल्यानंतर उद्या सकाळी ८.०८च्या कसारा लोकल येईल, तेव्हा येथे ४ आरपीएफचे जवान तैनात करण्यात येतील, असे आश्वासन रेल्वे प्रशासनातर्फे त्यांना देण्यात आले.