05 April 2020

News Flash

पुलाअभावी पादचारी बेजार!

मुंबई दिशेकडे असलेला जुना पादचारी पूल हा आकाराने लहान असल्याने या पुलावरही अधिकचे सुरक्षा रक्षक तैनात करावे लागतात.

|| आशीष धनगर

ठाणे, डोंबिवली रेल्वे स्थानकांतील प्रवाशांची घुसमट; जुने पादचारी पूल पाडले; नव्यांच्या उभारणीला मुहूर्त मिळेना :- मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेरील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे मार्गावरील धोकादायक पादचारी पूल तातडीने पाडण्याची तत्परता दाखवणाऱ्या रेल्वे प्रशासनाला या जागी नवीन पादचारी पूल उभारण्याची उसंत मात्र, मिळालेली नाही. ठाणे आणि डोंबिवली स्थानकांतील जुने पादचारी पूल पाडून सहा महिन्यांत नवीन पूल उभारले जातील, अशी घोषणा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने नव्या पुलाच्या कामाची एक साधी वीटही अद्याप रचलेली नाही. दुसरीकडे, स्थानकांतील पादचारी पुलांची संख्या कमी झाल्याने गर्दीतून बाहेर पडताना प्रवाशांची मात्र घुसमट होत आहे.

ठाणे स्थानकातील कल्याण दिशेकडील असलेला पादचारी पूल धोकादायक झाला असल्याने दुरुस्तीसाठी तोडण्यात आला होता. हा पादचारी पूल ६९ दिवसांत पुन्हा बांधून सुरू केला जाईल, असा दावा त्या वेळी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला होता. ठाणे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने या कामासाठी तातडीने लक्ष दिले जाईल, असा दावाही केला जात होता. प्रत्यक्षात हा पुल बंद करण्यात आल्यानंतर त्याचा एका बाजूचा गर्डर धोकादायक झाल्याने हा पूल पुन्हा नव्याने बांधावा लागणार असल्याचे रेल्वेच्या लक्षात आले आणि बांधणीचे नियोजन ढेपाळले. ठाण्याप्रमाणे डोंबिवलीतही असेच काहीसे चित्र पुढे आले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडे असणारा ३५ वर्षे जुना पादचारी पूल धोकादायक झाल्याने पाडण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी रेल्वे पूल बंद करून सहा महिने झाले आहेत तर डोंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल बंद करुन चार महिने उलटले आहेत. हे दोन्ही पादचारी पूल तातडीने उभे केले जातील, अशा घोषणा केल्या गेल्या होत्या. त्याच काळात लोकसभा निवडणुका असल्याने उमेदवारांनीही या पुलांची कामे तातडीने केली जावीत यासाठी दौरे केले होते. प्रत्यक्षात मोठा कालावधी उलटूनही या दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी कोणतीही हालचाल नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

इतर पुलांवर भार

सध्या ठाणे स्थानकात एकूण पाच पादचारी पूल असून त्यापैकी कल्याण आणि मुंबई दिशेकडे बांधण्यात आलेले दोन नवे पूल हे ठाणे महापालिकेच्या सॅटीस पुलाला जोडले नसल्याने या दोन्ही पुलांचा वापर करणे प्रवासी टाळतात. मुंबई दिशेकडे असलेला जुना पादचारी पूल हा आकाराने लहान असल्याने या पुलावरही अधिकचे सुरक्षा रक्षक तैनात करावे लागतात. स्थानकाच्या मध्यभागी असलेला पादचारी पूल आकाराने मोठा असल्या कारणाने या पुलावर प्रवाशांचा अधिक राबता असतो. त्यातच या पुलाच्या शेजारील दुसरा अन्य पूल बंद असल्यामुळे मधल्या पादचारी पुलावरचा प्रवाशांचा भार वाढला  आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेस या पुलाच्या जिन्यावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पुलावर येण्यासाठी फलाट क्रमांक ३, ४ आणि फलाट क्रमांक ५,६ वर एका बाजूला सरकते जिने आहेत. हे जिने आकाराने लहान असून ते अनेकदा बंद पडतात. अशा वेळी या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. डोंबिवली स्थानकात फक्त तीनच पादचारी पूल आहेत. त्यापैकी महत्त्वाचा असलेला कल्याण दिशेकडील पूल वापरासाठी बंद असल्याने नागरिकांना द्राविडीप्राणायाम घालून फलाट गाठावे लागत आहेत. तीनपैकी एक पूल बंद असल्याने इतर पुलांवर गर्दी वाढत असून त्या पुलांवर सुरक्षा रक्षक तैनात करावे लागत आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण दिशेकडे असलेला पादचारी पूल हा बंद करण्याआधी त्याच्या शेजारचा नवा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. तर बंद केलेल्या पुलाचा काही भाग हा प्रवाशांच्या वापरासाठी सुरू ठेवण्यात आला आहे. – अनिल कुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडे असणारा पादचारी पूल हा फेब्रुवारी महिन्यात बंद करण्यात आला होता. गेले सहा महिने हा पूल बंद करूनदेखील त्याचे बांधकाम अद्याप सुरूच करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्थानकाबाहेर जाताना वेळ लागतो.– सुमेध मोहिते, रेल्वे प्रवासी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2019 3:06 am

Web Title: central railways bridge station akp 94
Next Stories
1 बंदुकीचा धाक दाखवून २ लाख लुटले
2 ठाणे स्मार्ट सिटी कंपनीच्या सभेतही पडसाद
3 पुन्हा अटळहाल
Just Now!
X