शौचालये, स्वच्छता प्रकल्प, रस्त्यांची पाहणी
स्वच्छ भारत अभियानाच्या पाश्र्वभूमीवर गुणवत्तेनुसार देशभरातील शहरांची श्रेणी ठरविण्यात येणार असून त्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाने विविध शहरांतील स्वच्छतेचा आढावा घेतला आहे. या शहरांमध्ये ठाण्याचाही समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून केंद्राचे पथक शहरामध्ये तळ ठोकून बसले होते आणि त्यामध्ये त्यांनी शहरातील स्वच्छतेसंबंधी विविध उपक्रमांची माहिती व प्रत्यक्ष पाहणी केली. सर्वच शहरातील स्वच्छतेच्या पाहणीचा अहवाल येत्या २६ जानेवारीला जाहीर करण्यात येणार असून त्यामध्ये ठाणे शहर कोणत्या स्थानावर आहे, हे स्पष्ट होणार आहे.
केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान जाहीर करताच देशभरातील विविध शहरांनी त्यास प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. या अभियानासाठी शहरातील शौचालयांची साफसफाई, निगा व देशभाल राखणे तसेच कचऱ्याची वाहतूक व विल्हेवाट लावणे आदी कामे करण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, देशातील विविध शहरातील स्थानिक संस्थांनी स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून काही शहरे स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत.
दरम्यान, या अभियानातील कामांचे मूल्यमापन करून त्याआधारे शहरांची श्रेणी ठरविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात देशातील ७४ शहरांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये ठाणे शहराचा समावेश आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाची माहिती घेण्यासाठी केंद्राचे पथक ५ जानेवारीला ठाणे शहरात आले होते. ५ ते ७ जानेवारी असे तीन दिवस पथकाने शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला. या पथकामध्ये तीन जणांचा समावेश होता. त्यापैकी दोघांनी शहरातील विविध प्रकल्पांना अचानक भेटी देऊन त्यांची पाहणी केली. त्यामध्ये घंटागाडी, शहरातील विविध ठिकाणची शौचालये आणि रस्ते आदींची पाहणी करण्यात आली. तसेच पथकातील एकाने महापालिकेतील प्रकल्पासंबंधी कागदपत्रांची पाहणी केली. त्याआधारे सद्य:स्थितीमध्ये महापालिका स्वच्छतेमध्ये कोणत्या स्थानावर आहे, याचे मूल्यांकन पथकाकडून करण्यात येणार आहे. येत्या २६ जानेवारी शहर स्वच्छता मूल्यांकनाचा अहवाल आणि त्याआधारे शहरांची श्रेणी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.