ठाणे : भिवंडी शहरात रविवारी केंद्रीय आरोग्य पथकाने करोना उपाययोजनांची पाहणी केली. पथकाने भिवंडीतील करोना उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले, अशी माहिती भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव होत असून दिवसाला जिल्ह्याात ५ ते ६ हजार करोनाबाधित आढळून येत आहे. भिवंडी शहरात दररोज सरासरी १०० ते १५० रूग्ण आढळून येत आहे. भिवंडी शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. गौतम आणि डॉ. उपम आले होते. यांच्यासोबत भिवंडी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कारभारी खरात, डॉ. बुषारा सय्यद, डॉ. वर्षा बारोड हेदेखील उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य पथकाने सुरूवातीला इंदिरा गांधी रुग्णालयाजवळील महापालिकेच्या करोना चाचणी केंद्राची पाहणी केली. त्यानंतर येथील करोना लसीकरण केंद्र आणि मिल्लत नगर रबी मेडिकल येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली. पाहणी झाल्यानंतर पथकाने पालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया आणि अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय आरोग्य पथकाने शहरातील करोना उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केल्याचे डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले.