पनीर मसाला, पनीर टिक्का, दाल फ्राय, दाल मखनी.. पंजाबी पदार्थ तर आता सर्वाच्याच जिभेवर रुळले आहेत. हल्ली सण समारंभ वा विवाह सोहळा असेल तर पंजाबी पदार्थाची रेलचेल असते. पण पंजाबी पदार्थाची आणि त्यातल्या अस्सल मसाल्याची चव घ्यायची असेल तर मीरा रोड येथील ‘चख लो पाजी’ या पंजाबी उपाहारगृहात ती संधी उपलब्ध आहे.

सागर सारस्वत यांनी अवघ्या एक महिन्यापूर्वीच हे उपाहारगृह सुरू केले आहे. उपाहारगृहाच्या बाहेर धगधगणारी तंदूर भट्टी या ठिकाणी लज्जतदार पदार्थ मिळणार याची ग्वाही देते. पराठे, पनीरचे विविध पदार्थ, सरसो का साग या खास पंजाबी शाकाहारी पदार्थासोबतच तंदूरमध्ये तयार झालेले मांसाहारी पदार्थही या ठिकाणी मिळतात. शिवाय ‘चख लो पाजी’ची स्वत:ची खासीयत असलेले पदार्थही इथे आहेत. पंजाबी पदार्थाची खरी चव त्याच्या मसाल्यांमध्ये लपलेली असते. येथे मिळणारे सर्व पदार्थ खास पंजाबमधल्या अमृतसर आणि पटियाला या ठिकाणी मिळणाऱ्या मसाल्यांनी तयार केले जातात. सारस्वत यांचे मूळ गाव पंजाबमध्ये असल्याने मसाले ते तिथूनच मागवतात, शिवाय काही मसाले स्थानिक बाजारातूनही खरेदी करतात.

साँजी हा पंजाबचा प्रसिद्ध असलेला गोड पदार्थ. मीरा-भाईंदरच्या खवय्यांना तो सहसा खायला मिळणार नाही. म्हणूनच या उपाहारगृहात तो पराठय़ासोबत दिला जातो. कच्च्या कैरीपासून हा पदार्थ तयार होत असला तरी त्यात गूळ, मसाले घालून केला जातो म्हणूनच तो गोड लागतो. इतर शाकाहारी पदार्थासोबत अरबी करारी या पदार्थाला विशेष पसंती दिली जाते. बाजारात मिळणारा अळकुडी हा कंद उकडला जातो. त्याला मसाले लावून तंदूरमध्ये रोस्ट केला जातो. अळकुडीची त्यामुळे वेगळीच चव या ठिकाणी चाखायला मिळते. याशिवाय इथला ‘सोया पनीर टिक्का’ही खासच. एरवी बाजारात मलईपासून केलेले पनीर मिळते. मात्र हा पदार्थ तयार करण्यासाठी या उपाहारगृहात सोयाबीनपासून केलेल्या पनीरचा वापर केला जातो, त्याची एक वेगळीच चव आहे. नेहमीचे मसाले लावून लोखंडी सळईला पनीरचे तुकडे लावले जातात आणि तंदूरमध्ये ते रोस्ट केले जातात. सोयाचाप बिर्याणी हादेखील इथे मिळणारा आणखी एक वेगळा पदार्थ.

पंजाबमध्ये मिळणारे पराठे या ठिकाणी मिळतातच, परंतु खास बच्चे कंपनीसाठी ‘नटेला पराठा’ या ठिकाणी मिळतो. चॉकलेटचा वापर करून हा पराठा बनवला जात असल्याने लहान मुलांना तो विशेष आवडतो. इथे बनवले जाणारे पराठे तंदूरमध्येही तयार केले जातात तसेच ग्राहकाच्या पसंतीनुसार तव्यावरही ते शेकले जातात. ‘अलेपिनो चीज पराठा’ हा खास तरुणाईच्या पसंतीचा पराठा, अलेपिनो मिरचीचे बारीक तुकडे, चीज बॉल्स एकत्र करून त्याचा पराठा तयार केला जातो.

शाकाहारी पदार्थासोबतच या उपाहारगृहातील मांसाहारी पदार्थही चविष्ट आहेत. ‘चिकन चीज सॉसेज पराठा’ हा या उपाहारगृहाचा स्वत:चा पराठा. बाजारात मिळणारे चिकन सॉसेज आणि चीज यापासून हा पराठा तयार केला जातो आणि त्यावर विशिष्ट प्रकारच्या टॉपिंग्जची पखरण केली जाते. बोनलेस मटणापासून बनवलेले मटण बोटी कबाब, पंजाबी मटण करी, चिकन करी आदी मांसाहारी पदार्थही आपली वेगळी चव राखून आहेत. मत्स्यप्रेमींसाठीही खास तंदूरमध्ये केलेले तंदुरी मछली, सुरमई फिश टिक्का, तंदुरी फिश टिक्का या ठिकाणी उपलब्ध आहेत.

  • पत्ता – चख लो पाजी, दुकान क्र ६, लोटस अपार्टमेंट, सालासर गार्डन, हटकेश, मीरा रोड (पूर्व)
  • वेळ – सकाळी ९ ते दुपारी ४, सायंकाळी ७ ते रात्री १२.३०