देशातील रोजगार निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘कौशल्य विकासयुक्त भारत’ या दोन संकल्पनांची सुरूवात केली असून त्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाची निर्मिती केली आहे. पंतप्रधानांच्या या संकल्पनेचा पुरस्कार करत ठाण्यातील चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशनच्या वतीने कौशल्य विकास उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत १५ जुलै रोजी कौशल्य विकास दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने टिसा हाऊस, रोड नं. १६ टी, वागळे इस्टेट, ठाणे (प.) येथे सकाळी ११ वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी, एमएसएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी दौंड उपस्थित राहणार आहेत.
रोजगार निर्मितीच्या दृष्टीने लघुत्तम आणि लघु उद्योग क्षेत्राचे योगदान महत्वाचे मानले जात असून त्यामुळेच लघु उद्योजकांच्या कोसिआ या राष्ट्रीय संघटनेने कौशल्य विकास प्रकल्प हाती घेतला आहे. या संदर्भातील मार्गदर्शक प्रकल्प जानेवारी ते मार्च २०१५ या दरम्यान एमएसएसआयडीसीच्या सहकार्याने पार पडला आहे. या प्रशिक्षण वर्गातून १६० विद्यार्थ्यांनी लघु उद्योगामध्ये लागणाऱ्या व्यावहारिक बाबींचे प्रशिक्षण घेतले. या उपक्रमातून हिशेब व्यवस्थापन, निर्यात कागदपत्रे व्यवस्थापन आणि महिलांसाठी कपडे निर्मिती कौशल्य शिक्षण आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात आले. यापैकी ८४ विद्यार्थ्यांना तात्काळ लघु उद्योगातून प्रत्यक्ष नोकऱ्या मिळाल्या असून अन्य २२ जणांनी स्वत:चा लघु उद्योग सुरू केला आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबवल्यानंतर कौशल्य विकास प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. व्यापार उद्योगातील प्रशासकिय बाबींशी निगडीत विषयांबरोबरच उत्पादन आणि प्रक्रियेशी संबधीत अशा तांत्रिक कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकुण २१ विषयांवरील हे प्रशिक्षण त्या-त्या विषयातील तज्ञ आणि सोबत खुद्द उद्योजकांच्या सहकार्याने शिकवले जाणार आहे. या उपक्रमाची सुरूवात कौशल्य दिनाच्या निमित्ताने केली जाणार आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, एमएसएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी दौंड यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती कोसिआचे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम चेअरमन निनाद जयवंत यांनी दिली.