दातिवली, चिखलोली, समर्थवाडी, गुरवलीसाठी अहवालांना विलंब

सागर नरेकर, अंबरनाथ

दिवा कोपरदरम्यानच्या दातिवली आणि कल्याणपलीकडे चिखलोली, समर्थवाडी आणि गुरवली स्थानके उभारण्याची मागणी होत आहे, मात्र दातीवली आणि चिखलोली स्थानकांसाठी सुधारित अंदाजपत्रक, तर समर्थवाडी आणि गुरवली या स्थानकांच्या सुसाध्यता तपासणीचा अहवाल रेल्वे प्रबंधकांना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे ही स्थानके यंदाच्या वर्षांत उभारली जाण्याची शक्यता धूसर आहे.

गेल्या काही वर्षांत ठाण्यापलीकडे असलेल्या शहरांमधील लोकसंख्या वाढू लागली आहे. तो भार रेल्वे सेवेवर आणि लोकल गाडय़ांवर पडत आहे. दिवा, कोपर, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांत नव्याने उभ्या राहिलेल्या गृहसंकुलांमुळे रेल्वे प्रवासी वाढले आहेत. या भागात नवी रेल्वे स्थानके उभारण्यात यावीत, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे.

कोपर आणि दिवा स्थानकादरम्यान दातिवली स्थानकाची मागणी कोपर स्थानकाच्या निर्मितीपूर्वीपासून होत आहे. या भागात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर विकास झाल्याने लोकसंख्या वाढली आहे. तशीच काहीशी परिस्थिती अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणीचीही आहे. तर बदलापूरपासून वांगणीपर्यंत अनेक गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. त्या रेल्वे प्रवाशांना वांगणी, बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकांशिवाय पर्याय नाही. अशा प्रवाशांसाठी अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान चिखलोली, तर बदलापूर वांगणीदरम्यान कासगावजवळ समर्थवाडी रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी करण्यात आली होती.

खासदारांची मागणी कागदावरच

चिखलोली, दातिवली स्थानकांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली होती. समर्थवाडी, गुरवली स्थानकासाठी खासदार कपिल पाटील आग्रही आहेत. मुख्य रेल्वे व्यवस्थापकांनी वाणिज्य विभागाकडून अहवाल मागवला होता. चिखलोली आणि दातिवली स्थानकासाठी सुधारित खर्चाचे अंदाजपत्रक देण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळवले होते. तर गुरवली आणि समर्थवाडी स्थानकासाठी सुसाध्यता तपासणी अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते. आता हे अहवाल तातडीने देण्याचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. रेल्वे अर्थसंकल्पातही या स्थानकांचा स्पष्ट उल्लेख नाही.