News Flash

“पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाच बदला, आयुक्त कसले बदलता?”

भाजप- मनसेची जोरदार मागणी

संग्रहित छायाचित्र

संदीप आचार्य 
मुंबई: ठाणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या व तुटपुंजी उपाययोजना लक्षात घेऊन ठाणे महापालिका आयुक्तांसह चार आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र खरी गरज आहे ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आता बदला अशी मागणी भाजप आणि मनसेने केली आहे.

ठाणे जिल्हा व एमएमआर विभागात गेल्या दोन महिन्यात करोना वेगाने वाढत असताना पालक मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी नेमके काय काम केले ते लोकांना समजले पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून जर काही काम केले असते तर चार चार आयुक्तांची बदली का करावी लागली असा सवाल भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर यांनी केला. सपूर्ण महानगर प्रदेशातच करोना उपचारात अनागोंदी असून एकीकडे शासकीय किंवा पालिका रुग्णालयांमध्ये पुरेशी व्यवस्था निर्माण करण्यात आलेले अपयश तर दुसरीकडे खाजगी रुग्णालयांच्या लुटमारीला कोणताही आळा नाही, या परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील करोना रुग्ण वाढत आहे तर दुसरीकडे मृत्यू रोखण्यातही व्यवस्था पूर्ण अपयशी ठरले असून याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची असल्याचा आरोप आमदार संजय केळकर व मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी केला.

ठाणे मनपा क्षेत्रात आजच्या दिवशी ७६८६ रुग्ण संख्या असून २४९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. ठाणे जिल्हा रुग्णालय तसेच महापालिकेच्या शिवाजी रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात आज करोना रुग्णांची काय व्यवस्था आहे तसेच किती चाचणी केंद्र निर्माण केली असा सवाल करत संजय केळकर म्हणाले की, ठाणे शहर व जिल्ह्यातील करोनाचा प्रश्न सोडविण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे सपशेल नापास झाले आहेत, असेही संजय केळकर म्हणाले. आज सरकारने ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर पालिकेच्या आयुक्तांची केलेली बदली ही ठाणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची थट्टा असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.

ठाणे महापालिका, कल्याण- डोंबिवली महापालिकेत शिवसेना अनेक वर्षे सत्तेवर असताना आजपर्यंत आरोग्यसेवेचा विकास एकनाथ शिंदे यांनी का केला नाही, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला. आज ठाणे जिल्ह्यात २६,५०५ करोना रुग्ण असून ७५१ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. पालघरमध्येही ३८६६ रुग्ण असून ९३ जणांचे मृत्यू झाले. नवी मुंबईत ६०६७ रुग्ण तर १६३ मृत्यू, कल्याण- डोंबिवलीत ४५७५ रुग्ण व ७४ मृत्यू, मीरा- भाईंदर २५७५ रुग्ण व ११२ मृत्यू आणि वसई विरार मध्ये ३११९ करोना रुग्ण असून ८३ जणांचे मृत्यू झाले आहेत.

एकीकडे मुंबई महापालिकेने वेगाने वाढणारे रुग्ण लक्षात घेऊन करोना रुग्णालये निर्माण करणे, रुग्णालयातील खाटा वाढवणे, लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी क्वारंटाईन केंद्रात दीड लाखांपर्यंत रुग्णांची व्यवस्था करणे, तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमून उपचार व्यवस्थेचा नियमित आढावा घेणे, मृत्यूंच्या कारणांचा अभ्यास करून उपचाराची दिशा निश्चित करणे व प्रभावी उपचार सुचविण्याचे काम केले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्याचा नियमित आढावा घेऊन तात्काळ निर्णय घेण्याचे काम सतत करत होते. यासाठी आवश्यकतेनुसार मुंबई महापालिकेत केवळ करोनाचा सामना करण्यासाठी सात सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक मदत करण्यावर भर देऊन ठोस शासकीय व्यवस्था निर्माण करण्यात सपशेल नापास ठरले असून त्यामुळेच आज चार आयुक्तांची बदली करण्याची वेळ आल्याचे संजय केळकर म्हणाले. ठाणे जिल्हा रुग्णालय व कळवा येथील छत्रपती शिवाजी वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था दयनीय आहे. एवढे वर्षे ठाणे महापालिकेत सत्तेवर असून व गेली अनेक वर्षे मंत्री असून एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांच्या व जिल्ह्यातील आरोग्यासाठी काहीही ठोस केलेले नसल्याने त्यांना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलावे आणि ठाणे वाचवावे असे अविनाश जाधव म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 2:02 pm

Web Title: change the guardian minister eknath shinde why do you change the commissioner ask bjp and mns scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ठाणे : करोनामुळं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
2 वीजबिलांवरून बोंब!
3 नवे कोविड रुग्णालय रिकामेच
Just Now!
X