किशोर कोकणे

कोंडीच्या शक्यतेमुळे तीन हात नाका येथील खांबांना वाहतूक पोलिसांचा आक्षेप

मेट्रो प्रकल्पासाठी तीन हात नाका भागात उभारण्यात येत असलेल्या खांबांमुळे भविष्यात येथे मोठी कोंडी होण्याची शक्यता वाहतूक विभागाने वर्तवली आहे. यासंबंधीचा अभिप्राय मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील प्रकल्पाच्या आरेखनात बदल होऊ शकतो का, याची चाचपणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठाण्यातून मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वडाळा ते कासारवडवली मेट्रो चार प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी एमएमआरडीएने बसविलेल्या अडथळ्यांचा फटका प्रवाशांना बसत आहे. घोडबंदर भागात राहणाऱ्यांना कोंडीमुळे अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी तासभर वेळ लागतो. तीन हात नाका येथील टिप टॉप प्लाझा, तीन हात नाका सिग्नल आणि सिग्नलजवळील आरटीओसमोरील उड्डाणपुलाच्या बाजूला अशा तीन ठिकाणी मेट्रोचे खांब उभारण्यात येणार आहेत. तीन हात नाक्यावर मेट्रोच्या कामांसाठी उभारलेल्या अडथळ्यांमुळे दररोज रात्री वाहतूक कोंडी होते. त्यामुळे तीन ठिकाणी जर मेट्रोचे खांब उभारले तर प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या खांबांच्या उभारणीस आक्षेप घेतला असून यासंबंधी सविस्तर अहवाल मुंबई महानगर विकास प्राधिकरणास पाठवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्याचे सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्या पथकाने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसह बुधवारी सायंकाळी या भागाची पाहणी केली. या दौऱ्यात पोलिसांनी आपले मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी आरेखनात बदल करण्याचे कबूल केल्याचे वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे. या संदर्भात एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी आरेखनात थोडा बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मेट्रोसाठी काही ठिकाणी खांब उभारण्यात येणार होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली असती. या विषयावर गेल्या काही दिवसांपासून एमएमआरडीएशी चर्चा सुरू होती. एमएमआरडीएकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

– अमित काळे, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा