‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्तानंतर विभागीय व्यवस्थापकांचे आश्वासन

रेल्वे पोलीस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांसाठी अस्तित्वात असलेल्या ‘चेंजिग रूम’ची दुर्दशा झाली असल्याची अनेक उदाहरणे पुढे येत असताना यासंबंधीचे सविस्तर वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर ठाणे, कल्याण डोंबिवली परिसरातील महिला प्रवासी संघटनांनी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला. त्यावेळी विभागीय व्यवस्थापक ओझा यांनी सीएसटी ते कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील महिला स्वच्छतागृह आणि ‘चेंजिंग रूम’चे सर्वेक्षण करून आवश्यक तेथे या सोयी उपलब्ध करून देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महिला प्रवाशांना ओझा यांनी दिले.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी पूर्ण करणाऱ्या महिला रेल्वे पोलिसांना मात्र कपडे बदलण्यासाठी वेगळी खोली नसल्याने कुचंबणा सहन करावी लागत आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात चेंजिंग रूम उपलब्ध नसल्याने महिलांना स्वच्छतागृहामध्ये जाऊन कपडे बदलावे लागत आहेत, तर स्वच्छतागृहांची अवस्थाही बिकट असल्याने महिला पोलिसांची परिस्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पोलीस ठाण्याच्या इमारतींमधील अस्वच्छ वातावरणामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता. या संदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’च्या ८ मार्च रोजीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांचे कार्यालय गाठले. त्यांना रेल्वे पोलीस ठाण्यातील महिला स्वच्छतागृह आणि ‘चेंजिंग रूम’चे वास्तव दाखवून दिले. यावर ओझा यांनी तत्काळ सीएसटी ते कल्याण मार्गावरील पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूमची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. आवश्यक ठिकाणी स्वच्छतागृह आणि महिलांसाठीची खोली उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महिला प्रवाशांना दिले आहे.

पाठपुरावा कायम सुरू राहणार..

महिला दिनानिमित्ताने पोलिसांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न महिला रेल्वे प्रवाशांच्या वतीने करण्यात आला. या उपक्रमाला पाठिंबा मिळाल्याने विभागीय व्यवस्थापकांनी याची दखल घेतली आहे. महिला प्रवासी संघटनांनी त्यासंदर्भातील पत्र अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे. महिला पोलिसांचा हा प्रश्न कायम सुटेपर्यंत हा लढा कायम सुरू राहणार असल्याची माहिती महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या वंदना सोनावणे यांनी दिली.