तरुणी, रिक्षाचालक मारहाण घटनेनंतर ठाणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

मानपाडा भागात सोमवारी सायंकाळी युवतीसह रिक्षाचालकावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे वाहतूक पोलिसांनी आता टोइंग व्हॅनवर काम करणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना चारित्र्य पडताळणीच्या दाखले तातडीने जमा करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारचे दाखले सादर केल्याशिवाय कर्मचारी काम करताना आढळून आला तर संबंधित टोइंग वाहनमालकाचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णयही वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

ठाणे येथील मानपाडा भागात रिक्षातून प्रवास करणाऱ्या युवतीला वाहतूक पोलिसांच्या टोइंग वाहनावरील खासगी कर्मचाऱ्यांनी अश्लील हावभाव करत तिच्यासह रिक्षाचालकाला मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वाहनावरील त्या चार कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यामध्ये दुर्वेश राजू जाधव (२३), शमशाद बबलू खान (२१), राकेश कृष्णा मोहन (३०) आणि रमेश धीरुभाई पटेल (३०) या चौघांचा समावेश आहे. यापैकी शमशाद हा मिरा रोडचा, तर उर्वरित तिघे ठाणे शहरातील रहिवाशी आहेत.

या घटनेमुळे टीकेचे धनी ठरलेल्या वाहतूक पोलिसांनी आता टोइंग वाहनावरील कर्मचाऱ्यांना चारित्र्य पडताळणीचा दाखला सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘‘टोइंग वाहनांवर कार्यरत असलेल्या खासगी कर्मचाऱ्यांना चारित्र्य पडताळणीचा दाखला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतरही चारित्र्य पडताळणी दाखल्याशिवाय वाहनांवर काम करताना आढळून आला तर संबंधित टोइंग वाहनमालकांचे कंत्राट रद्द करण्यात येणार आहे,’’ असे ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.

रिक्षाचालक मदतीसाठी धावला..

गेल्या काही वर्षांपासून रिक्षा प्रवासादरम्यान महिलासोबत चालकांकडून गैरवर्तणुकीचे प्रकार घडत असतानाच सोमवारच्या घटनेमध्ये मात्र रिक्षाचालक पीडित युवतीच्या मदतीसाठी धावला. ब्रह्मांड सिग्नलवर वाहने थांबलेली असताना वाहतूक पोलिसांच्या टोइंग वाहनांवरील कर्मचारी रिक्षात पाठीमागे बसलेल्या युवतीकडे पाहून अश्लील हावभाव करत असल्याचे चालकाने पाहिले आणि या कर्मचाऱ्यांच्या कृतीमुळे ती युवती घाबरल्याचेही त्याला दिसून आले. त्यामुळे रिक्षाचालकाने टोइंग वाहनचालकाला पुढे जाण्याचा सांगितले. याचाच राग आल्याने त्यांनी काही अंतरावर रिक्षा अडवून चालकासह युवतीला मारहाण केली.

‘त्या’ वाहतूक पोलिसांची चौकशी..

टोइंग वाहनांवर कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखतच मारहाणीचा संपूर्ण प्रकार घडला, पण त्या कर्मचाऱ्याने केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप पीडित युवतीने केला आहे. तसेच या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी तिने केली आहे. याबाबत पोलीस उपायुक्त अमित काळे यांना विचारले असता, या प्रकरणामध्ये संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचीही सविस्तर चौकशी करण्यात येईल व तो दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.