सामाजिक उत्तरदायित्वाचे भान राखून गेली काही वर्षे कॉर्पोरेट विश्व आपल्या नफ्यातील विशिष्ट हिस्सा बाजूला काढून त्यातून दुर्गम आणि दुर्लक्षित क्षेत्रात सेवाभावी प्रकल्प राबवू लागले आहे. त्यातून सर्वसामान्यांना पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा मिळू लागल्या आहेत. मात्र आपल्याकडे ‘सीएसआर’ संकल्पना कार्यान्वित होण्याच्या कितीतरी आधीच बदलापूर येथील एका व्यक्तीने १९९२ मध्ये नेत्रचिकित्सेच्या क्षेत्रात धर्मादाय उपक्रम सुरू केला. बदलापूर गावातील साकीब गोरे यांनी सुरू केलेल्या या नेत्रचिकित्सा उपक्रमाने आता चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. येत्या जागतिक आरोग्यदिनी ( ७ एप्रिल) रौप्य महोत्सवी टप्पा गाठणाऱ्या या चळवळीविषयी..

वयोमानापरत्वे डोळ्यात मोतीबिंदू होतात. साधारण पन्नाशीनंतर जवळपास सर्वानाच हा त्रास होतो. त्यामुळे दृष्टिदोष निर्माण होतो. मोतीबिंदू पिकून फुटला तर डोळा निकामी होऊन अंधत्व येऊ शकते. त्यामुळे शस्त्रक्रिया करून मोतीबिंदू काढून टाकावा लागतो. मात्र ग्रामीण भागातील गरीब जनता डोळ्यांच्या या आजाराकडे पैशांअभावी दुर्लक्ष करते. त्यामुळे कालांतराने ते दृष्टी गमावून बसतात. परिणामी आधीच वृद्धत्वामुळे कुटुंबात नकोसे झालेल्यांना अंधत्वामुळे परावलंबी होऊन राहावे लागते.
बदलापूर गावातील साकीब गोरे या तरुणाने हे वास्तव पाहिले. दुर्गम भागातील आरोग्य सुविधांचा हा अंधार दूर करायचा असेल तर आपणच सुरुवात करायला हवी, असा निश्चय करत प्राथमिक आरोग्य केंद्रात १९९२ मध्ये सहकारी मित्रांसमवेत पहिल्यांदा नेत्रचिकित्सा शिबीर भरविले. पहिल्याच वर्षी ११०९ रुग्णांनी याचा लाभ घेतला. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात फारशी जागा नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना नंतरचे तीन दिवस शहरातील दुबे रुग्णालयात ठेवले जाई. वर्षांगणिक या शिबिरांचा पसारा वाढत गेला. उल्हासनगरचे सेंट्रल हॉस्पिटल, मुरबाडचे ग्रामीण रुग्णालय येथे उपचार होऊ लागले. सध्या अंबरनाथ तालुक्याबरोबरच मुरबाड, शहापूर, कल्याण या परिसरातील गाव-पाडय़ांवरील रहिवासी या नेत्रचिकित्सेचा लाभ घेतात. रुग्णांच्या तपासणीसाठी उपरोक्त तालुक्यांमध्ये १३९ ठिकाणी तपासणी केंद्रे आहेत. सुरुवातीच्या काळात टाक्याची शस्त्रक्रिया होई. आता अत्याधुनिक फेको यंत्राद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया होते. आतापर्यंत १२१७ गावपाडय़ांवरील लाखो लोकांनी या शिबिरांचा लाभ घेतला आहे. रुग्णांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात येते. शासकीय रुग्णालयात जेवणाची व्यवस्था केली जाते. शस्त्रक्रियेआधी शारिरीक तपासणी केली जाते. त्यातून रक्तदाब, मधुमेह असे अनेक आजार उघडकीस येतात. कारण अनेकांनी अशा प्रकारची तपासणी तत्पूर्वी केलेलीच नसते. शिबिरातील सर्व उपचार विनामूल्य असतात. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही चळवळ अतिशय लाभदायी ठरली आहे. साकीब गोरे पहिल्या शिबिराची एक आठवण सांगतात. मुरबाड तालुक्यातील गेटवाडी येथील पडशानामक एका वृद्धाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू होते. त्यातील एका डोळ्यातील मोतीबिंदू फुटून दृष्टी निकामी झाली होती. दुसऱ््या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्याला दिसू लागले. मोतीबिंदूमुळे जवळपास १५ वर्षे तो अंध म्हणूनच वावरत होता. त्यामुळे दरम्यानच्या काळात जन्माला आलेल्या नातवांचा चेहराही त्याने पाहिला नव्हता. रुग्णालयातून रात्रीच निघून त्याने घर गाठले.

साडेचार लाख चष्मेवाटप, ३५ हजार शस्त्रक्रिया
वर्षभरात सप्टेंबर ते एप्रिल अशा आठ महिन्यांच्या काळात दरवर्षी ही चळवळ सुरू असते. आतापर्यंत या उपक्रमात ४ लाख ५१ हजार ५२१ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ३ लाख ७४ हजार ६९३ जणांना चष्मेवाटप करण्यात आले. ३५ हजार ५५४ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.