चाळमाफियांकडून महिन्याकाठी वापरासाठी २०० ते ५०० रुपये आकारणी

प्रसेनजीत इंगळे, विरार

स्वच्छ भारत अभियानच्या वतीने सरकार शौचालय अभियान मोहीम भारतभर राबवत आहे. त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केल जात आहेत. शौचायाल घरोघरी असावे असा नारा देत आहे. मात्र वसई विरार महापालिका क्षेत्रात रहिवाशांना शौचालयासाठी महिन्याला पैसे मोजावे लागत आहेत. या पैशांवर चाळमाफिया मालामाल झाले आहेत. गेली १५ वर्षे हा परिसर सार्वजनिक शौचालयापासून वंचित राहिला आहे.  परंतु आजतागायत शासनाची शौचालय अभियान या विभागात पोहचलेले नाही. याशिवाय महापालिकाही या प्रकारापासून अनभिज्ञ आहे. येथे आजही येथील चाळमाफिया कुटुंबप्रमुखाकडून शौचालयाचा वापर करण्यासाठी  महिन्याकाठी २०० ते ५०० रुपये मोजत आहेत.

नालासोपारा येथील कारगिल रोड  परिसरात यादव नगर, शर्मावाडी, गुप्ता नगर, अशा अनेक बैठय़ा चाळी आहेत. या परिसरात तीन हजार कुटुंबे राहतात. या परिसरात अनेक रस्ता, पाणी, गटार या समस्या तर आहेतच याशिवाय शौचालयाची मुख्य समस्या आहे. लोकांना शौचालये नसल्याने त्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत.

चाळ मालकांनी रहिवाशांना घरे देताना शौचालये बांधून देण्याचे आश्वासन दिले होते.  पण चाळीचे काम झाल्यावर चाळमाफिया पसार झाले. नंतर केवळ वस्ती वाढत गेली पण शौचालये बांधली गेली नाहीत. त्यानंतर या भागात नव्याने चाळी  बांधणे सुरू झाले. त्या वेळी शौचालये बांधण्यास सुरुवात झाली. परंतु त्यांचा वापर करण्यासाठी शौचालय नसलेल्या रहिवाशांना पैसे मोजावे लागत आहेत.

या संधीचा फायदा घेत चाळमाफियांनी शौचालयाचा धंदा बनवून टाकला. शौचालये बांधून लोकांकडून महिन्याला २०० ते ५०० रुपये घेऊ  लागले. महिन्याकाठी लाखो रुपयाचा हा धंदा बनत गेला. सध्या या विभागात ३० हून अधिक खासगी म्हणजेच चाळमाफियांच्या मालकीची शौचालये आहेत. त्यातून चाळमाफिया महिन्याला लाखो रुपयाचे उत्पन्न मिळवत असल्याचे येथील रहिवासी मंगल माथुर यांनी सांगितले.

आम्ही शौचालये बांधण्यासाठी प्रयत्न केले. पण कुणी जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे शौचालय बांधायचे कुठे हा प्रश्न आहे. एक सार्वजनिक शौचालय बांधले आहे. जर जागा मिळाल्या शौचालये बांधण्यात आले आहे.

सरिता दुबे, सभापती प्रभाग फ