टोलेजंग इमारतींमध्ये मध्यमवर्गीयांच्या फसवणुकीचा आरोप, माजी नगरसेवकाची फलकबाजी

बदलापूर : शहराच्या गरजेपेक्षा अधिकचा पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरातील पूर्व भागात येणाऱ्या शिरगाव, भोसले नगर आणि विस्तारित भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. तरीही या भागात नव्या टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. येथे नव्याने येणाऱ्या रहिवाशांची पाण्यासाठी फसवणूक होऊ  नये म्हणून येथील माजी नगरसेवकाने फलकबाजी करत अनोखे आंदोलन केले आहे. ‘येथे पाण्याची टंचाई असून पुढे मनस्ताप होण्यापेक्षा घरे घेताना काळजी घ्या’, असे थेट आवाहन या फलकांद्वारे येथे येणाऱ्या ग्राहकांना केले आहे. त्यामुळे येथील बांधकाम व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.

गेल्या वर्षांत बदलापूर शहरासाठी अतिरिक्त पाणी उचल करण्याची परवानगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला मिळाली आहे. तरीही जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे सातत्याने शहरातील विविध भागांत पाण्याची समस्या बारमाही बनत चालली आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र टँकरमधून होणारा पाणीपुरवठा नळाद्वारे का होत नाही, असा सवाल उपस्थित करत येथील माजी नगरसेवक अरुण सुरवळ यांनी अनोखे आंदोलन सुरू केले आहे.  ग्राहकांची ही फसवणूक रोखण्यासाठी सुरवळ यांनी या परिसरात फलकबाजी केली आहे. ‘सदर परिसरात पाण्याची तीव्र टंचाई आहे. परिसरात पिण्याचे पाणी कमी दाबाने येत आहे. तेव्हा येथील विकासकांच्या आमिषाला बळी पडू नका, घर घेताना काळजी घ्यावी अन्यथा विनाकारण मनस्तापास सामोरे जावे लागेल’, असा मजकूर त्या फलकांवर लिहिला आहे. समाजमाध्यमांवरही फलकबाजीची चर्चा आहे.

या भागात ५० हजारांहून अधिकची लोकसंख्या असून अनेक नव्या इमारतीही उभ्या राहात आहेत. अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे येथे प्रकल्प असून या अनोख्या आंदोलनामुळे बांधकाम व्यावसायिक चिंतेत आहेत. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या बांधकाम प्रकल्पांना यामुळे खीळ बसण्याची भीती व्यक्त होते आहे. मात्र येथील पाण्याची परिस्थिती बिकट असून पालिका, जीवन प्राधिकरण यांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांची फसवणूक होऊ  नये यासाठीच हा प्रपंच केल्याचे अरुण सुरवळ यांनी सांगितले आहे.