मोबाइल दूरध्वनीवरील ‘हॅगो’या गेम अ‍ॅपच्या माध्यमातून एका २० वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.

याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अमिन मकंदर (२५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अमिनने १ लाख ९५ हजार रुपयांचे दागिने घेतल्याचा आरोप पीडित मुलीकडून करण्यात आला आहे.

मोबाइल दूरध्वनीवर गुगल प्लेस्टोअरमध्ये  हॅगो हे गेम अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून गेम खेळताना अनोळखी व्यक्तींशीदेखील संवाद साधता येत असतो. मुंब्रा येथील अमृतनगर परिसरात राहणाऱ्या एका मुलीने हे अ‍ॅप डाऊनलोड केले होते.

ऑनलाइन गेम खेळत असताना तिची ओळख अमिन मकंदर नावाच्या एका मुलासोबत झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झाले. त्यानंतर अमिनने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून घरातील १ लाख ९५ हजार रुपयांचे दागिने घेतले. दागिने घेतल्यानंतर अनेकदा पीडित मुलगी अमिनशी संपर्क करत होती. मात्र, तो होऊ शकत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित मुलीने याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.