ठाण्यात लोकसत्ता पूर्णब्रह्मतून खाद्य परंपरेचा शब्दप्रवास

तिखट पंक्तीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या भरल्या खेकडय़ांपासून ते थेट गोड आप्प्यांपर्यंतच्या पाककलेच्या रुची आणि गुणांच्या मौलिक मार्गदर्शनाची मैफल पितांबरी रुचियाना गूळ प्रस्तुत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ कार्यक्रमात मंगळवारी संध्याकाळी ठाण्यात रंगली. विविध ज्ञातींची वैशिष्टे मानल्या जाणाऱ्या खाद्य वैशिष्टय़ांचा आढावा मान्यवर तज्ज्ञांनी या मैफलीत घेतला. त्यामुळे ऐन श्रावणाच्या संध्याकाळी रसिकांची श्रवणानंदी टाळी लागली.

पाठारे-प्रभू पदार्थाची खास वैशिष्टय़े, आगरी-कोळी समाजातील मांसाहारी पाककृती, भंडारी आणि सारस्वत समाजातील खाद्यपदार्थ याची प्रात्यक्षिकाद्वारे ओळख करून देत या खाद्यपदार्थाविषयी करण्यात आलेली चर्चा ठाणेकर खवय्यांसाठी विशेष लक्षवेधी ठरली.

खाद्यपदार्थाची मूळ चव राखण्यासाठी पदार्थ बनवताना पाककृतींची रीतसर प्रक्रिया अवलंबणे महत्त्वाचे असते, हे जाणणाऱ्या ठाणेकर खवय्यांनी टिप-टॉप प्लाझा येथे ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ कार्यक्रमासाठी गर्दी केली होती. एका वाचकाने लिहिलेल्या ‘महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा अभिमान मराठी माणसाला’ या कवितेचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी केलेले सादरीकरण कार्यक्रमाची रंगत वाढवणारे होते. कोणताही पदार्थ खाताना त्या पदार्थाशी, पदार्थ बनवणाऱ्या व्यक्तीशी, पदार्थ बनत असलेल्या जागेशी आपले एक नाते तयार होत असते. कदाचित म्हणूनच शाळेत मिळणारा कोणताही पदार्थ पुढे वयाच्या विविध टप्प्यांवर आठवत राहतो, असे पदार्थ आणि खवय्ये यांचे नाते खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासिका मोहसिना मुकादम यांनी उलगडले. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमधील कानाकोपऱ्यात लपलेल्या वैशिष्टय़ांवर भर देत या पाककृतींच्या नोंदी इंग्रजी भाषेत ठेवल्यास महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, असे मत मोहसिना मुकादम यांनी व्यक्त केले.

प्रत्येक समाजातील खाद्यपदार्थ हे त्याच समाजात पाहायला मिळतात. त्यामुळेच या खाद्यपदार्थाची आढळणारी सामाजिक, आर्थिक, धार्मिक वैशिष्टय़े समजून एकात्म अशी महाराष्ट्राची दर्जेदार खाद्यसंस्कृती जगासमोर आणायला हवी, असे त्यांनी सांगितले. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकात खाद्यपदार्थाची माहिती देणाऱ्या कल्पना तळपदे, दीपा पाटील, ज्योती चौधरी मलिक, शुभा प्रभू-साटम यांच्याशी संवाद साधला.

  • पाककृतींचे प्रात्यक्षिक आणि विविध पदार्थाची इत्थंभूत माहिती मिळाल्यामुळे या कार्यक्रमाचा अनुभव फारच चांगला होता. स्नेहल झाळे, ठाणे
  • गेली चार वर्षे सातत्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे. प्रत्येक वर्षी एक वेगळा अनुभव मिळतो. गिरीश नाईक, ठाणे
  • ‘पूर्णब्रह्म’ या अंकाची मी नियमित वाचक आहे. दर वर्षी स्वयंपाकाचे नवनवीन पैलू या अंकामध्ये वाचायला मिळतात. वृषाली कुलकर्णी, ठाणे