News Flash

ठाण्याचे सुशोभीकरण झाडांच्या मुळावर

यासंबंधी पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, वस्तुस्थिती तपासून योग्य तो निर्णय घेण्यात येईल,

कचराळी तलाव परिसतील झाडांच्या खोडांना रंग लावण्यात आलेला आहे.

रासायनिक रंगांमुळे वृक्षांना अपाय होत असल्याचा दावा

रस्ते रुंदीकरण, बिल्डरांच्या विकास प्रकल्पांसाठी ठाणे शहरातील शेकडो झाडांची बिनधोकपणे कत्तल सुरू असताना आता महापालिकेच्या शहर सौदर्यीकरणाचा फटका हिरव्यागार झाडांना बसू लागला आहे. महापालिका मुख्यालयालगत असलेल्या कचराळी तलावाचे रूपडे पालटण्याच्या नादात या भागातील झाडांच्या खोडांना रंग चढविला जात असून यामुळे पर्यावरणतज्ज्ञ आणि प्रेमी कमालीचे अस्वस्थ आहेत. झाडांच्या खोडांना अशा प्रकारे रंग चढविला गेल्यास त्यांचे आयुष्य कमी होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे असून महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग मात्र यासंबंधी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करू, असा दावा करत आहेत.

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या काही महिन्यांपासून शहरात सौंदर्यीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील अस्वच्छ भिंती रंगवल्या जात आहेत. तसेच पदपथ, रस्त्यांलगतच्या मोकळ्या जागा यांचे रूपडे पालटण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असतानाच, पालिकेच्या वृक्षविभागातील काही अधिकाऱ्यांनी अतिउत्साहाच्या भरात शहरातील जिवंत झाडेही रंगवण्याची टूम काढली आहे.  ठाणे महानगरपालिका मुख्यालयालगत असलेल्या कचराळी तलाव परिसतील शोभेची ७६ झाडे तसेच पायरच्या झाडावर पूर्णपणे रंग चढवण्यात आला आहे.

या रासायनिक रंगांमुळे झाडांना मोठय़ा प्रमाणात अपाय होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया ‘फर्न’ या पर्यावरण संस्थेच्या संचालिका सीमा हर्डीकर यांनी दिली. यासंबंधी महापालिका आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे, असेही त्या म्हणाल्या. महाराष्ट्र (शहरी क्षेत्र)संरक्षण आणि संवर्धन कायदा १९७५ नुसार अशा प्रकारे जिवंत झाडांवर कोणतीही प्रक्रिया करणे कायद्याने गुन्हा आहे. झाडांची रंगरंगोटी हा एक प्रकारे त्यांच्यावर केलेला रासायनिक विषप्रयोगच असल्याचा दावा त्यांनी केला.

यासंबंधी पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, वस्तुस्थिती तपासून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. वृक्ष प्राधिकरण अधिकारी केदार पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.

रस्त्यांवर लावलेल्या झाडांना रंग दिल्यास त्याचा सकारात्मक फरक दिसून येतो, तर याउलट उद्यानातील किंवा तलावाकाठी असलेल्या झाडांवर रासायनिक रंग लावल्यास त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. झाडांच्या खोडांमध्ये काही प्रमाणात शोषणक्षमता असते. त्यामुळे रासायनिक रंगामध्ये असणाऱ्या घटकांच्या तीव्रतेवर हा परिणाम अवलंबून आहे.

राजू भट, वनस्पतितज्ज्ञ

झाडांना असलेला धोका

* झाडांच्या खोडावर लेंटीसेल्स नावाची छिद्रे असतात. ज्यांच्यामार्फत झाडे प्राणवायू आणि कार्बनडॉक्साईड तसेच बाष्पाचे अदानप्रदान करतात. त्यावर रंग लावल्याने ही छिद्रे काही प्रमाणात बुजून झाडांच्या वायूंच्या अदानप्रदानावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

* रंगाच्या थरामुळे झाडांच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर परिणाम होऊ शकतो. रंगामधील रासायनिक घटक झाडांमध्ये शोषले जाऊन ते झाडांच्या उतींनी अपाय करू शकतात.

* रंगाच्या दुष्परिणामांची तीव्रता वृक्षाची प्रजाती, वय, वाढ, रंगांची प्रत, थर, रंग किती काळ राहिला आहे यावर अवलंबून असते असे निरीक्षण वनस्पतितज्ज्ञ श्री. द. महाजन, डॉ. विनया घाटे यांनी नोंदविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 2:37 am

Web Title: chemical colours damaging trees
Next Stories
1 युतीपूर्वीच भाजपकडून रिपाइंला १२ जागा
2 जिल्ह्यतील मतदारांत घट
3 ओमी कलानींच्या भाजप प्रवेशात स्थानिकांचा खोडा
Just Now!
X