कंपन्या हलविणे अव्यवहार्य असल्याची उद्योजकांच्या ‘कामा’ संघटनेची भूमिका
येथील प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाच्या पाश्र्वभूमीवर औद्योगिक विभागातील रासायनिक कंपन्या अन्यत्र हलविण्याची चर्चा सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा अशासकीय ठरावही करण्यात आला आहे. मात्र, शहराच्या विकासात या कंपन्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे अपघात होतो म्हणून कंपन्या स्थलांतरित करा, ही भूमिका योग्य नाही अशी भूमिका उद्योजकांच्या कामा संघटनेच्या सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाला आता महिनाभराचा कालावधी उलटत आला आहे. या स्फोटाच्या पाश्र्वभूमीवर डोंबिवली औद्योगिक विभागातील रासायनिक कंपन्या हलविण्याच्या घोषणा झाल्या. महापालिकेच्या महासभेतही याविषयी अशासकीय प्रस्ताव मंजूर होत आहे. परंतु आम्हाला कोणीही विचारात न घेता परस्पर निर्णय घेत आहेत. यासंबंधी कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चिरग असोसिएशनच्या सभासदांनी गुरुवारी पत्रकारांशी चर्चा केली. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष संजीव कटेकर, मुकंद देव, नंदकुमार भागवत, अभय पेठे, श्रीकांत जोशी, मुरली अय्यर आदी उपस्थित होते.
शहराच्या विकासात कंपन्यांचा मोठा वाटा असून स्थानिक संस्थांना यातून कर मिळतो. असे असूनही केवळ एक अपघात झाल्यामुळे कंपन्याच येथून स्थलांतरित करण्याच्या घोषणा केल्या जातात. इतरही क्षेत्रांत मोठे अपघात हे होत असतात. अशा वेळेस ते क्षेत्र बंद करणे अथवा हलविण्याच्या चर्चा होत नाही. मग केवळ रासायनिक कंपन्यांच्या बाबतीत हे का होते, असा सवाल या वेळी संस्थेच्या सदस्यांनी उपस्थित केला. एमआयडीसी परिसरात निवासी विभागाचे अतिक्रमण होते. ते रोखणे एमआयडीसीच्या हाती असतानाही त्यांनी त्यात चालढकल केल्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत आहेत. अशा घटना घडत असतानाही औद्योगिक विकास महामंडळाकडून अजूनही अशा प्रकारच्या परवानग्या का देण्यात येतात, असा सवालही या वेळी उद्योजकांनी उपस्थित केला. कंपन्या हलविणे हे वाटते तेवढे सोप्पे नाही. यात कामगार, मोठी यंत्रे तसेच दळणवळणाचाही विचार करावा लागेल. उद्योजकांना हे सर्व परवडणारे आहे की नाही हेही पाहावे लागेल. वाडा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ येथे या कंपन्या हलविण्यात येतील असे सांगितले जात आहे. तेथील लोक आमचे हसत स्वागत करणार आहेत का? असा सवाल उद्योजकांनी केला. अंबरनाथ येथेही औद्योगिक विभागात निवासी विभाग झपाटय़ाने वाढत आहे. तेथे काही दुर्घटना घडली की तेथूनही स्थलांतर केले जाईल का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. महापालिकेनेही महासभेत प्रस्ताव मंजूर केला परंतु आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही किंवा त्याविषयी लेखी काहीही कागदपत्र आमच्याकडे नसल्याने याविषयी आत्ता काही बोलणे योग्य होणार नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले.