उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
डोंबिवली एमआयडीसीतील औद्योगिक व निवासी विभाग एकदम जवळ आले आहेत. निवासी विभागातील जीवनमानाचा विचार करता औद्योगिक विभागातील रासायनिक कंपन्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी संध्याकाळी दुर्घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. पालकमंत्री एकनाथ िशदे यांनीही देसाई यांच्या वक्तव्याची री ओढली असून यामुळे उद्योजकांमध्ये मात्र आतापासूनच नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी डोंबिवलीत आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यासंबंधी कोणतेही ठोस वक्तव्य केलेले नाही.
प्रोबेस कंपनीच्या परिसरात मदतकार्य व पुनर्वसनाचे काम पूर्ण होईपर्यंत या कंपनीच्या परिसरातील सर्व कंपन्या येत्या आठवडाभर बंद ठेवण्याचे आदेश देसाई यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. कंपनीचालकांनी मात्र आम्हाला एमआयडीसीकडून कंपन्या बंद ठेवा, असे काहीही कळविले नाही, असे सांगितले. निवासी विभाग हा औद्योगिक कंपन्यांच्या जवळ आला आहे. त्यामुळे रहिवाशांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रहिवासी, कामगारांचे जीवनमान महत्त्वाचे असल्याने निवासी व औद्योगिक विभाग याबाबत शासन निश्चित धोरण ठरवेल. ज्या कंपन्या प्रमाणापेक्षा रसायनांचा अधिक साठा करून ठेवतात, अशा कंपन्या निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, रवींद्र चव्हाण, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, कडोंमपाचे आयुक्त ई. रवीन्द्रन, महापौर राजेंद्र देवळेकर, ठाण्याचे पोलीस सहआयुक्त आशुतोष डुम्बरे आदी उपस्थित होते.

एमआयडीसी अंधारात
स्फोटामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी प्रोबेस कंपनी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात अंधार आहे. परिसरात कभिन्न काळोख पसरला आहे. विशिष्ट रसायनांचा वास या भागात पसरला आहे. त्यामुळे रहिवाशी हैराण झाले आहेत. घरात पंखे चालू नसल्याने व हवेत दरुगधी पसरल्याने रहिवासी अस्वस्थ आहेत.

आतापर्यंतच्या दुर्घटना
* ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी नाकरे कंपनीला आग. जीवितहानी नाही
* ७ डिसेंबर २०१३ शिळ रस्त्यावरील गायकर कम्पाऊंडजवळील जुन्या केमिकल कंपनीला आग.
* १४ मे २०१४ रोजी केमस्टार कंपनीला आग. एक कामगार ठार
* ५ मार्च २०१६ अल्ट्रा प्युअर केमिकल कंपनीत भीषण आग. १२ कामगार जखमी
* २३ जानेवारी २०१४ डोंबिवलीत हिरवा पाऊस

कंपनीच्या एक ते दोन किलोमीटर परिसरातील इमारती, बंगले, कंपन्यांची काचेची तावदाने फुटली. काही जणांच्या घरातील दूरचित्रवाणी संचही फुटले तर विजेवर चालणाऱ्या इतर वस्तूही खराब झाल्याच्या तक्रारी आहेत. स्फोटानंतर परिसरातील मोबाइलसेवाही कित्येक तास कोलमडल्याने भेदरलेल्या लोकांची आपापल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याची धडपड फोल ठरत होती.

अग्निशमन दलाचे दहा बंब तसेच दहा टँकर दुर्घटनास्थळी थडकले. मात्र स्फोटाने रस्त्यांवर काचांचा खच पडून रस्तेच गायब झाल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. प्रोबेस कंपनीकडे जाणारे सर्व रस्ते वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केले. फक्त अत्यावश्यक वाहने दुर्घटनास्थळी सोडण्यात येत होती. दुपापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकही दाखल झाले. अग्निशामक जवानांना दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळविता आले.

मृतांची नावे
ज्ञानेश्वर हजारे, महेश पांडे, राजू शगिरे, नीलम देठे, एक अनोळखी व्यक्ती

जखमींची नावे
शालिनी रेडेकर (८०), प्रियंका गोडसे (३५), सुधीर रेडेकर (५५), श्वेता प्रधान, वाल्मीक यादव, संदीप मोघे, प्रियंका बलवलमारे, संजय रामागुडे, कांतिलाल कुंदर, रवींद्र वालावलकर, आकाश पुजारी, स्नेहा मोरे, निशा नेघे, बालाजी सिंह, आनंद आचार्या, शोभनाथ गुप्ता (७०), उमीद प्रसाद, ओंकार मांढरे, शांताराम यादव, ललित, छगन सिंह, कांताबेन पटेल, ज्ञानदेव महाडिक, भिकाजी बाबाडी, वासुदेव भंडारी, राजेश शर्मा, कैलास धुमाळ (२०), जयवंत पाटील, इजाझ अन्सारी (२९), ज्योती सईद (३१), मंदार रत्नपारखी (३१), गुलाब दुबे (४९), जयश्री सावंत (१४),तुषार बट्टी (१४), रितेश मिश्रा (१४),उर्वी मंडालिया (२९), श्रीकांत रालेभाटे (३०), भालचंद्र वारालकर (३३), विक्रम निवाटे (३५), पुष्कराज भोळे (३०), भिरेंद्र सिंह (२२), सागर पवार (१८), ओमप्रकाश पुरम (२६), अशोक चव्हाण (३२), राजेश राजे (४४), अनिल कदम, संदीप गायकवाड (२४), जगदीश आचार्य (५४), सचिन पाटील (२७), यशोधन तांबे (८०), सुशीला शिंदे , विजया हलानाली , सागर शिंगारे , तुषार हंडे , गिरीश पाटील, प्रदीप कारंडे, तनुश्री नादगरी, मोहम्मद अब्दुल, कुणाल खोत, धर्मा देव, स्वप्निल मरदुंगे, मनीषा वैंगणकर, राजन राऊत, मंगेश मानकर, आरती भोईर, प्रियंका घोडगे, सुरेश पवार, वनीता ताण्डे, जाई अडविलकर, मंजुळा वानापाटील, नीतेश पुजारी, कविता भुरे, रेणुका शिंदे, सचिन कोहरेकर, सचिन मारगेर, ज्योती मोगरे, जितेंद्र परदेशी

 

मुक्या प्राण्यांचाही बळी
दोन कुत्रे, एक बैलाचा मृत्यू किंगफिशर पक्षी बचावला

स्फोटाचा फटका कर्मचारी, नागरिक आणि आजूबाजूच्या परिसरातील प्राण्यांनाही बसला. या स्फोटामुळे दोन कुत्रे आणि एक बैलाचा बळी गेला तर एक किंगफिशर पक्षी मात्र या दुर्घटनेतून थोडक्यात बचावला आहे.
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक रासायनिक कंपन्यांमध्ये माल पोहोचविण्यासाठी सात ते आठ बैलगाडय़ा या परिसरात उभ्या असतात. गुरुवारी या परिसरात अशाच प्रकारे बैलगाडय़ा आणि बैल उभे होते. ज्ञानेश्वर हजारे हे बैलगाडी चालक या कंपनीमध्ये माल पोहोचविण्यासाठी पोहोचले होते. त्याच वेळी झालेल्या स्फोटामुळे ज्ञानेश्वर हजारे आणि त्यांचे दोन्ही बैल गंभीर जखमी झाले. जखमी हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या अपघातात हजारे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दोन्ही बैलांना उशिरापर्यंत कोणताही उपचार मिळू शकला नाही. त्यामुळे एका बैलाचा काही वेळेतच मृत्यू झाला. दुसरा बैल विव्हळत असल्याचे पाहून याच भागातील काही रहिवाशांनी धाव घेऊन त्याच्यावर शक्य तसे उपचार सुरू केले. काहींनी त्याला पाणी पाजले.
जखमी अवस्थेत असलेल्या या बैलाची प्रकृती सुधारत असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. हजारे यांच्या मालकीचे आणखी दोन बैल असून ते मात्र सुरक्षित आहे.