एमआयडीसीतील प्रोबेस कंपनी स्फोटात नुकसान झालेल्या कंपनी मालकांनी विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाई मिळविण्यासाठी मोठय़ा संख्येने दावे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. स्फोट झालेल्या कंपनीच्या परिसरात अनेक विमा कंपन्यांचे निरीक्षक दावे दाखल झालेल्या कंपन्यांच्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी भेटी देताना दिसत आहेत.

कंपन्यांचे विधि व विमा सल्लागार नुकसान भरपाईच्या दाव्याची कागदपत्रे तयार करण्यासाठी कार्यरत आहेत. दावा दाखल केल्याशिवाय विमा कंपन्यांचे प्रतिनिधी नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी कंपनीत येत नाहीत. नुकसानीची प्राथमिक माहिती विमा कंपनीला दिल्यानंतर तातडीने विमा कंपनीचे प्रतिनिधी कंपनीत पाहणीसाठी येतात. त्यानंतर कंपनी मालकाने किती रकमेचा विमा उतरविला होता, झालेले नुकसान आणि कायदेशीर तरतुदींचे पालन करीत मग नुकसान भरपाईच्या आकडय़ाची जुळवाजुळव करण्यात येते.भीषण स्फोटात खाक झालेल्या प्रोबेस एन्टरप्रायसेस या कंपनीचा दावा विमा कंपनीकडे करण्यात आला आहे. कंपनीच्या नुकसानीची पाहणी विमा कंपनीने केली आहे. प्रत्यक्ष कागदपत्र पाहिल्यानंतर नुकसानीची रक्कम ठरविण्यात येईल. प्रोबेस कंपनीचे मालक डॉ. विश्वास वाकटकर या घटनेतून सावरले नसल्याचे समजते.

जोपर्यंत विमा कंपनीकडून कंपनीची पाहणी होत नाही तोपर्यंत कंपनी मालकाला कंपनी सुरू करताना अडथळे असतात. स्फोटामुळे कंपनी किती बेचिराख झाली याची छायाचित्रे विमा प्रतिनिधी घेतात. जोपर्यंत हा अंदाज, छायाचित्रे घेण्यात येत नाहीत, तोपर्यंत मालकाला उत्पादन सुरू करता येत नाही. अनेक कंपनी मालकांनी तातडीने अशा प्रकारचे सर्वेक्षण करून उत्पादन प्रक्रियेला सुरुवात केली आहे, असे कंपनीच्या काही प्रतिनिधींनी सांगितले.