कंपन्यांतून रासायनिक वायू सोडला जात असल्याचा आरोप

अंबरनाथ : औद्योगिक वसाहतीतून सोडल्या जाणा ऱ्या रासायनिक वायूमुळे अंबरनाथ शहरावर रात्रीच्या वेळी रासायनिक धुराची चादर पसरत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. अंबरनाथ पूर्वेतील बी केबिन रस्ता, मोरिवली पाडा, नवरेनगर, निसर्ग ग्रीन परिसर, पाठारे पार्क, फॉरेस्ट नाका परिसर आणि चिखलोली भागात मंगळवारी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याचे जाणवत होते. या धुरामुळे काही भागांत रासायनिक दुर्गंधीही जाणवल्याची तक्रार करण्यात येत असून या प्रदूषणामुळे श्वसानाचे विकार असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

अंबरनाथ शहरातील औद्योगिक कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक वायूमुळे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने नागरिकही घराबाहेर पडू लागले आहेत. मात्र सकाळी आणि सायंकाळच्या वेळी शहरातील विविध भागांत रासायनिक धुराची चादर पसरल्याने नागरिकांचे बाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे. अंबरनाथ शहराच्या पश्चिमेत रेल्वे रुळाला लागून मोरिवली औद्योगिक क्षेत्र आहे. येथील कंपन्यांमधून अनेकदा रासायनिक वायू सोडला जात असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. येथून सोडल्या जाणा ऱ्या वायूमुळे अंबरनाथ पश्चिमेतील काही भाग तसेच पूर्वेतील मोरिवली पाडा, नवरेनगर, निसर्ग ग्रीन संकुल परिसर, पाठारे पार्क, बी केबिन रोड, फॉरेस्ट नाका या भागांत मोठ्या प्रमाणावर धूर पसरलेला असतो. त्यामुळे येथील नागरिकांना रासायनिक दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे विकार असलेल्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.

अनेकदा या धुराचे प्रमाण इतके असते की चिखलोली भागही धुरात दिसेनासा होतो. काटई कर्जत आणि कल्याण बदलापूर रस्त्याला जोडणा ऱ्या जोडरस्त्यावरही वाहनचालकांना दृश्यमान कमी झाल्याने जपून वाहने चालवावी लागतात. याबाबत स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांतर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी कधीही अशा रासायनिक धुराची किंवा वायूची पाहणी केली नसल्याचा आरोप आता स्थानिकांकडून होतो आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नागरिकांकडून सातत्याने विविध माध्यमांतून तक्रारी केल्या जात असल्या तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कंपन्यांवर कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही. अनेकदा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कंपन्यांमध्ये पाहणी केली जाते. मात्र, प्रदूषण करणा ऱ्या कंपन्यांवर कोणतीही कारवाई केल्याचे कधीही पाहायला मिळालेले नाही.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा तक्रारी आल्यानंतर तात्काळ पाहणी करून कारवाई करत असते. मंगळवारच्या प्रकाराचीही पाहणी करून कारवाई केली जाईल. – शंकर वाघमारे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण.