भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे मार्गदर्शन
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पात वारंवार लागणाऱ्या आगीला प्रतिबंध करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) मार्गदर्शनानुसार कचऱ्यावर रसायनांची फवारणी करण्यात येणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याची हमी महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून उत्तन प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने उघडय़ावरच कचरा साठवून ठेवला जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याने घरगुती कचऱ्यासोबतच कारखान्यातील रासायनिक कचराही एकत्रितपणे याठिकाणी साठवला जातो. परिणामी मिथेन हा विषारी वायू तयार होऊन कचऱ्याला वारंवार आग लागते. या आगीने निर्माण होणारा प्रचंड धूर उत्तन व आसपासच्या गावात पसरत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याविरोधात उत्तनमधील नागरी संघर्ष समितीने न्यायालयात धाव घेतली असल्याने सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयापुढे सुरू आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आयआयटीकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला न्यायालयाने महापालिकेला दिला होता. त्यानुसार आयआयटीच्या तज्ज्ञांनी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली होती.
या पाहणीनंतर आयआयटीने ग्रामस्थांना तातडीचा दिलासा देण्यासाठी कचऱ्याला वारंवार आग लागू नये यासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार हायड्रोस्कोपिक तंत्रज्ञानाचा वापर करून मॅग्नेशियम क्लोराइड हे रसायन कचऱ्यावर फवारण्यात येणार आहे. यामुळे मिथेन वायूवर नियंत्रण होऊन आग लागण्याचे प्रमाण कमी होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली. येत्या आठ ते दहा दिवसांत प्रत्यक्ष फवारणीला सुरुवात होणार आहे.
प्रकल्प वसई तालुक्यातील सकवार येथे स्थलांतर होण्यासाठी बराच अवधी लागणार असल्याने सध्या प्रकल्पात साठत असलेल्या कचऱ्यावर पुन्हा प्रक्रिया सुरू करण्यावर न्यायालयाचा भर आहे. याबाबतही महापालिकेला आयआयटीचे मार्गदर्शन पालिकेला मिळत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या विविध पद्धती महापालिकेने जाहिरातीद्वारे मागवल्या आहेत. या पद्धती प्राप्त झाल्यानंतर त्या आयआयटीकडे पाठविण्यात येणार आहेत.
त्यानंतर उत्तन कचरा प्रकल्पासाठी यातील कोणती पद्धत योग्य ठरेल याचा निर्णय आयआयटी घेणार असून ही पद्धत नक्की झाल्यानंतर महापालिका ती पद्धत प्रकल्पात बसविण्यासाठी निविदा काढणार आहे.
तोपर्यंत कचऱ्यावर रसायनांची फवारणी करून ग्रामस्थांना धुरापासून दिलासा देण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.