मालाड मालवणी येथे विषारी दारूमुळे शंभरहून अधिक बळी गेल्यानंतर ठाणे जिल्हय़ात राजरोसपणे सुरू असलेल्या दारूभट्टय़ांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. केवळ ठाणेच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक भागांतील दारूभट्टय़ांना गुजरातच्या सीमावर्तीय भागातून कच्च्या मालाचा पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब उघड होत आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांच्या हद्दीतील मुंब्रा, देसई गावातील दारूच्या भट्टय़ांनी पालघर, डहाणू, वसई यांसारख्या गुजरात सीमेलगतच्या भागांत बस्तान बसवले आहे. विशेष म्हणजे, गावठी दारूची तस्करी करण्यासाठी मोटारसायकलीच्या इंधनटाक्यांचा वापर केला जात असल्याचेही तपासातून समोर आले आहे.
काही वर्षांपूर्वी ऐरोली परिसरात विषारी दारू प्याल्यामुळे ३२ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्या वेळी मुंब्रा, देसई गाव आणि उरणलगतच्या धुतूम परिसरातून गावठी दारूचा मोठय़ा प्रमाणात पुरवठा होत असल्याचे उघड झाले होते. त्या वेळी पोलिसांनी या दारूच्या अड्डय़ांविरोधात कडक मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी घडलेल्या मालवणी दारूकांडानंतर ठाणे पोलिसांनी शीळ-डायघर येथील देसई गावातील खाडी किनाऱ्यापासून एक ते दीड किलोमीटर आतील पात्रात गावठी दारूनिर्मितीची भट्टी उद्ध्वस्त केली, मात्र मुंब्रा, देसई पट्टय़ातील बहुतांश दारूभट्टी चालवणाऱ्यांनी वसई, पालघर, डहाणू या भागांत स्थलांतर केल्याचे सध्या सुरू असलेल्या पोलीस तपासणीत उघड झाले आहे.
गुजरातमध्ये दारूबंदी असली तरी तेथील महाराष्ट्र सीमेलगतच्या भागांतून गावठी दारू तसेच दारूनिर्मितीसाठीच्या मालाची मोठय़ा प्रमाणात आयात होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळेदेखील मुंब्रा, देसई परिसरातील दारूभट्टय़ा वसई, डहाणू, पालघर भागांत हलवण्यात आल्याचे समजते.

तस्करीसाठी दुचाकींच्या इंधनटाक्या

काही दशकांपूर्वी टायरच्या टय़ूबमध्ये गावठी दारू भरून त्याची वाहतूक केली जात होती.  कालांतराने यासाठी चारचाकी वाहनांचा वापर होऊ लागला. कारच्या मोकळ्या जागेमध्ये दारूसाठय़ाकरिता विशिष्ट बदल करण्यात येत होते आणि त्याद्वारे गावठी दारू वितरित होत असे. मात्र, पोलिसांनी त्यावरही लक्ष देणे सुरू करताच आता माफियांनी दुचाकींचा वापर सुरू केला आहे. मोटारसायकलच्या इंधनटाक्यांमध्ये बदल करून त्यातून दारूची ने-आण होत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

नीलेश पानमंद/ जयेश सामंत, ठाणे