पर्यावरणमंत्र्यांच्या पाहणीनंतर जिल्हा प्रशासनाला जाग

भिवंडी परिसरातील नागरी वसाहतीलगत अनधिकृत गोदामे उभारून त्यामध्ये रसायनांचा बेकायदा साठा करणारे व्यावसायिक आणि जमीनमालकांकडे गेली अनेक वर्षे डोळेझाक करणाऱ्या जिल्हा प्रशासनाला पर्यावरणमंत्र्यांच्या या भागातील पाहणी दौऱ्यानंतर उशिरा का होईना जाग आली असून येथील पूर्णा, राहनाळ, वळ, दापोडा, गुंदवली आणि ओवळी या गावांमधील तब्बल १९ रासायनिक गोदामे सील करण्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे. आठवडाभरापूर्वी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या भागात केलेल्या पाहणीत रसायनांचा साठा करणारी तब्बल १९३ गोदामे आढळून आली होती.

भिवंडी परिसरात खाडीकिनारी भराव टाकून तसेच काही गावांना लागून मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहात असून, या भागात गेल्या काही वर्षांत हजारोंच्या संख्येने बेकायदा गोदामे उभी राहिली आहेत. या भागातील बरेचसे क्षेत्र राज्य सरकारने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले आहे. या भागाच्या नियोजनबद्ध विकासाच्या मोठय़ा घोषणा यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या महानगर विकास प्राधिकरणाचेही नव्याने उभ्या राहात असलेल्या बांधकामांकडे दुर्लक्ष होत आहे. या गोदामांमधून मोठय़ा प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असून, काही ठिकाणी नागरी वस्त्यांना लागूनच अत्यंत ज्वालाग्राही रसायनांचा साठा केला जातो. यापूर्वीही या गोदामांमधील रसायनांचा स्फोट होऊन मोठय़ा आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतरही जिल्हा प्रशासनाने येथील गोदामांकडे डोळेझाक केल्याचे चित्र आहे.

पर्यावरणमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर पळापळ

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नुकताच या भागातील गोदामांचा पाहणी दौरा केला. या पाहणीदरम्यान भिवंडी तालुक्यातील रसायनांचा साठा करण्यात आलेली गोदामे व तेथील बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी सहा गावांमधील तब्बल १९३ गोदामांमधून रसायनांचा साठा होत असल्याचे दिसून आढळल्याने या भागात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्यानजिल्हा प्रशासनाने या भागातील १९ गोदामे सील करण्याचा निर्णय घेतला आहे.