07 March 2021

News Flash

पेट टॉक : ‘चिहुआहुआ’ मूर्ती लहान पण..

विविध देशांतील श्वानांच्या या वैशिष्टय़ांमुळे परदेशी श्वान पाळले जाऊ लागले.

घरातला सोबती म्हणून श्वान पालनास सुरुवात झाली आणि केवळ राखणदारी म्हणून या श्वानांकडे न पाहता घराची शोभा वाढवणारे सदस्य अशी ओळख रूढ झाली. परदेशी श्वान न जातींना मागणी वाढली ती या श्वानांच्या इतर वैशिष्टय़ांमुळेच. जर्मनी देशातील ‘डॉबरमन’ श्वान प्रजात राखणदारीसाठी उपयुक्त तर स्पेनमधील ‘कॉकर स्पॅनिअल’ दिसायला आकर्षक. विविध देशांतील श्वानांच्या या वैशिष्टय़ांमुळे परदेशी श्वान पाळले जाऊ लागले. आता श्वान पालनाचा हेतू फक्त राखणदारीपुरता मर्यादित राहिलेला नाही. या श्वान प्रजातींपैकी ‘चिहुआहुआ’ श्वान सध्या जगभरात लोकप्रिय आहेत. एखाद्या महिलेच्या पर्समध्ये किंवा लहान मुलाच्या खेळण्याच्या बास्केटमध्ये हे श्वान दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. त्याचे कारण असे की अगदी लहान आकारात असलेले चिहुआहुआ श्वान त्यांच्या याच वैशिष्टय़ासाठी लोकप्रिय आहेत. मेक्सिको येथे चिहुआहुआ श्वानांचे १४०० वर्षांपूर्वीचे संदर्भ आढळतात. मेक्सिकोमध्ये हे श्वान ब्रीड ओळखले गेल्यावर नवव्या शतकात आदिवासी लोक या श्वानांचा खाण्यासाठी उपयोग करत. कालांतराने युरोपियन लोक तिथे गेल्यावर त्यांनी युरोपमध्ये हे ब्रीड आणले आणि तेव्हापासून जगभरात हे श्वान लोकप्रिय झाले. १९०४ मध्ये अमेरिकन केनेल क्लबमध्ये चिहुआहुआ श्वानांची प्रथम नोंद झाली आणि जगातील सर्वात लहान श्वान म्हणून हे ब्रीड ओळखले जाते.
आकाराने अत्यंत लहान असलेल्या या श्वानां ची उंची जेमतेम दहा इंचापर्यंत असते. चिहुआहुआ श्वानांचे दोन प्रकार आढळतात. या जातीच्या काही श्वानांच्या शरीरावर केसांचे प्रमाण थोडे जास्त असते तर काही श्वानांच्या शरीरावर तुरळक केस आढळतात. वेगवेगळ्या रंगात चिहुआचिहुआ श्वान पाहायला मिळतात.
भेट देण्यास उपयुक्त श्वान
आकाराने अत्यंत लहान आणि दिसायला आकर्षक असल्याने हे लहानसे चिहुआहुआ भेट म्हणून देण्यासाठी अलीकडे वापरले जातात. कॉफी मगमध्ये या श्वानांना ठेवून भेट म्हणून दिले जातात. हॉलीवूडमधील अनेक नटय़ांच्या पर्समध्ये हे श्वान पाहायला मिळतात.
या श्वानांनी अनेक वर्षांपासून आपली लोकप्रियता कायम राखली आहे. दिसायला लहान असले तरी हे घाबरट नसून सतर्क असतात. आत्मविश्वास खूप असल्याने मोठय़ा श्वानांवरही झडप घालतात. मालकाशी एकनिष्ठ असल्याचे यांचे वैशिष्टय़ अधिक भावते. या श्वानांच्या समोर मालकाला फटकारले तर कोणतीही भीती न बाळगता मालकाच्या रक्षणासाठी हे आपल्यावर झडप घालतात. या श्वानांपासून कोणतीही इजा होत नसली तरी प्रेम आणि एकनिष्ठता यामुळे मालकाच्या रक्षणासाठी कायम सतर्क असतात. तळहातावर मावणारे हे श्वान लहान मुलेही योग्यरीत्या हाताळू शकतात.
आहार अत्यंत कमी
चिहुआहुआ श्वानांचा आकार, उंची लहान असल्याने आहार अत्यंत मापून द्यावा लागतो. काही गॅ्रममध्ये या श्वानांना आहार दिला जातो. जास्त आहार झाल्यास वेगाने यांचे वजन वाढून शरीराला त्रास होतो. यासाठी योग्य मापात आहार द्यावा लागतो. तसेच या श्वानांना नियमित व्यायामाचीही गरज असते. या श्वानांचे एकावेळचे खाणे जेमतेम दहा ते पंधरा ग्रॅम एवढेच असते. साधारणत: बाजारात मिळणाऱ्या तयार डॉग फूडमध्ये प्रथिने, कॅल्शिअम यांचे योग्य प्रमाण दिले असल्याने हेच आहार म्हणून दिले जाते.
घरात पाळताना या श्वानांची काळजी घ्यावी लागते. एखाद्या व्यक्तीचा पाय पडल्यास या श्वानांचा जीव दगावण्याची शक्यता असते. या श्वानांचे ब्रीिडगही सोपे असते. मात्र हे श्वान दोन ते तीन पिल्ले देऊ शकतात. यापेक्षा अधिक पिल्लांना जन्म दिल्यास आरोग्याला धोका संभवतो. या श्वानांची जमिनीपासून उंची अतिशय कमी असल्याने त्यांना उष्णतेचा त्रास होतो. त्यामुळे डोळ्यातून पाणी येणे, ताप येणे यासारखे आजार उद्भवतात. उष्ण ठिकाणी घेऊन गेल्यास डोळ्यात घालण्यासाठी औषध सतत जवळ ठेवावे लागते. बाजारात या श्वानांसाठी मऊ कापडाचे पट्टे मिळतात. हे वापरल्यास या श्वानांना इजा पोहचत नाही. कायम पट्टय़ाने बांधून फिरवण्याची सवय त्यांना करावी लागते. मुंबई, कोल्हापूर, पुणे, बंगळूर, चेन्नई, हैद्राबाद या ठिकाणी या श्वानांचे ब्रीिडग होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2016 4:10 am

Web Title: chihuahua dog
Next Stories
1 शहरबात ठाणे : कोंडीमुक्तीचे नव्हे..वृक्षतोडीचे ठाणे
2 आठवडय़ाची मुलाखत : पर्यावरण रक्षणातूनच शाश्वत विकास शक्य
3 बेसुमार उपसा, बंद पडला हापसा!
Just Now!
X