|| प्रकाश लिमये

चाईल्ड हेल्प फाऊंडेशन

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

मूलभूत गरजांपासून वंचित राहिलेल्या आणि समाजाकडून दुर्लक्षित झालेल्या मुलांचा सर्वागीण विकास या ध्येयाने स्थापन झालेली ‘चाईल्ड हेल्प फाऊंडेशन’ ही संस्था आज खऱ्या अर्थाने या मुलांचा आधारवड बनली आहे.

देशाच्या पूर्व भागातील काही राज्यांमध्ये आजही लहान मुलांसाठी काम करण्याची गरज आहे. एकेकाळी या लहान मुलांमध्ये समावेश असलेल्या राजेंद्र पाठक आणि जुगेंदर सिंह या पूर्वेकडील राज्यातील युवकांना आणि त्यांचे सहकारी सुनील वर्गीस यांना अशा समाजातील वंचित मुलांसाठी काहीतरी करायची तळमळ होती. २००५ मध्ये मुंबईत आल्यानंतर त्यांनी त्या दिशेने कार्य करण्यास सुरुवात केली. परंतु या कार्याला समाजाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. हे युवक खरच मुलांसाठी काम करतील की नाही, आपण दिलेला पैसा योग्य ठिकाणी खर्च होईल की नाही यावर लोकांनाच विश्वास नव्हता. त्यामुळे या युवकांच्या कार्याला गती येत नव्हती. अखेर २०१० मध्ये या तिघांनी विश्वस्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि ‘चाईल्ड हेल्प फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेचा जन्म झाला. आज या संस्थेशी अनेक सदस्य, संस्था जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे एकेकाळच्या इवल्याशा रोपटय़ाचा आज आधारवड बनला आहे.

संस्थेचे उद्दिष्टच मुळी लहान मुले असून त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजा भागवणे आणि त्यांचा भावनिक तसेच सर्वागीण विकास साधत त्यांच्या जीवनात जगण्यासाठीचा आशेचा किरण निर्माण करणे हे असून त्या दिशेनेच संस्थेची वाटचाल सुरू आहे.

शिक्षणाशिवाय सर्वच व्यर्थ आहे. त्यामुळे मुलांना किमान प्राथमिक शिक्षण तरी मिळेल यासाठी संस्थेचा प्रयत्न असतो. यासाठी गरजू मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत संस्थेकडून केली जाते. मुलांना शिक्षण देणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था काम करत असतात. परंतु या संस्थांना कमतरता असते ती निधीची. चाईल्ड हेल्प फाऊंडेशन ही कमतरता भरून काढते. अशा संस्थांमधील मुलांच्या शैक्षणिक शुल्काचा भार ही संस्था उचलते. आतापर्यंत ४६५० मुलांना या संस्थेचा थेट लाभ मिळाला आहे. याशिवाय मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी त्यांना आणि विशेषकरून मुलींना प्रोत्साहन देण्याचे काम संस्था करत आहे.

पालघर जिल्ह्य़ातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांशी ही संस्था जोडली गेली आहे, तसेच जव्हार भागातील आदिवासी मुलांच्या कुपोषणावरही संस्था काम करत आहे. या ठिकाणी संस्थेने स्वत:च कुपोषित मुलांसाठी केंद्र स्थापन केले आहे, तसेच या भागातील ३० आश्रमशाळांना संस्था आपल्या परीने मदत देत आहे.

मुलांच्या आरोग्य क्षेत्रातही संस्थेचे भरीव योगदान आहे. हृदयाशी संबंधित आजार, कर्करोग, तसेच विविध गंभीर आजार असलेल्या मुलांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्याची संस्थेची धडपड असते. राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यंमत्री वैद्यकीय सेवा निधी योजनेचा मोठी मदत संस्थेला मिळत आहे. या योजनेतून अनेक रुग्णदेखील संस्थेकडे पाठवण्यात येत असतात. संस्थेने आतापर्यंत हृदयरोगाशी संबंधित ७५ आणि २४९ कर्करोगाशी संबंधित मुलांना वैद्यकीय आधार मिळवून दिला आहे.

पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांना अनाथाश्रमाच्या माध्यमातून निवारा मिळवून देण्याचे काम संस्थेने केले आहे. १३ अनाथाश्रमांशी संस्था जोडली गेली असून आतापर्यंत ७९० अनाथ मुलांना त्यांच्या गरजा, शिक्षण आदींची सोय करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शाळांमधून स्वच्छतागृह बांधण्याचा महत्त्वाचा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे.

कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग

कुपोषण कमी करण्यासाठी जव्हार तालुक्यातील सावरपाडा येथे संस्थेने सुरू केलेल्या स्वयंपाक घराच्या माध्यमातून १ ते ६ वयोगटांतील मुलांना सकस आहार देण्याचे काम केले जात आहे. संस्थेच्या या समाजकार्याचा रथ ओढायचा म्हणजे असंख्य हातांची गरज भासते. यासाठी संस्थेकडून कॉर्पोरेट कंपन्या आणि व्यक्ती यांना या समाजकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत असते. कॉर्पोरेट क्षेत्रातील अडीच हजार व्यक्ती आज या कार्यात स्वत:हून सहभागी होत आहेत हे संस्थेच्या कार्याचे यश मानावे लागेल.

prakashlimaye6@gmail.com