मशिदीवर लावण्यात आलेले भोंगे हे नेहमी वादाचा विषय ठरत आले आहेत. पण एरव्ही नियमित वेळाने अल्लाहला साद घालणाऱ्या मशिदीवरील भोंग्याने बुधवारी एका हरवलेल्या दीड वर्षांच्या मुलाची त्याच्या आईची भेट घडवून आणली. ठाण्यातील हनुमाननगर टेकडी भागातील एका मंदिराच्या आवारात हरवलेले हे मूल दोन तास आईच्या ओढीने व्याकुळपणे रडत होते. मात्र, शेजारच्या मशिदीतून याबाबतची घोषणा झाली आणि कासावीस झालेल्या आईनेही धावत मंदिर गाठून आपल्या बाळाला उराशी कवटाळले. ‘कोणत्याही धर्मापेक्षा माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ असतो’ या उक्तीची प्रचीतीच या घटनेच्या निमित्ताने आली.
वागळे इस्टेटमधील हनुमाननगर टेकडी भागातील एका गणपतीच्या मंदिरातील पुजाऱ्यांना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास मंदिराच्या आवारात रडत असलेले दीडेक वर्षांचे मूल आढळले. त्या बाळाला मंदिराजवळ आणून पुजाऱ्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांकडे ‘हे बाळ कुणाच्या ओळखीचे आहे का?’ ‘कुणी बाळ शोधत असेल तर त्यांना कळवा’ असे सांगण्यास सुरुवात केली. मात्र, ते मूल कुणाच्याही ओळखीचे नव्हते. आईपासून ताटातूट झालेल्या त्या बाळाला रडू आवरत नव्हते. आईला साद घालत ते कावऱ्याबावऱ्या नजरेने तिला शोधत होते. दीड वर्षांच्या त्या मुलाला बोलताही येत नव्हते. त्यामुळे त्याच्या आईवडिलांचा ठावठिकाणा शोधायचा कसा, हा प्रश्न पुजाऱ्यांपुढे उभा ठाकला.
दोन तास उलटल्यानंतरही या बाळाच्या पालकांचा पत्ता लागत नव्हता. मुलाचे आर्त रडणे आणि पुजाऱ्यांची धावाधाव पाहून मंदिराच्या आवारात गर्दी जमली. पण बाळाच्या आईवडिलांबद्दल कुणालाच माहीत नव्हते. एवढय़ातच येथून जाणाऱ्या एकाने ही बातमी मंदिराजवळच असलेल्या मशिदीत कळवली. हे समजताच मशिदीच्या व्यवस्थापकांनी तेथील ‘आजान’ देण्याच्या लाऊडस्पीकरमधून मूल हरवल्याची घोषणा केली. ‘कुणाचे दीड वर्षांचे बाळ हरवले असेल तर, त्याने त्वरित हनुमाननगर येथील गणपती मंदिरात संपर्क साधावा’ अशी घोषणा मशिदीतून करण्यात आली. पाठोपाठ टेकडी परिसरातील अन्य मशिदींनाही अशी घोषणा करण्याची सूचना देण्यात आली. टेकडीवरील एका लहान मशिदीत ही घोषणा इतका वेळ आपल्या बाळाला जवळपास शोधणाऱ्या माळी दाम्पत्याच्या कानी पडली आणि त्यांनी त्वरित मंदिराकडे धाव घेतली. मंदिरात आईला पाहताच इतका वेळ रडणाऱ्या बाळाच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित फुलले आणि आपल्या बाळाच्या वियोगाने धास्तावलेल्या आईच्या हुंदक्यांना पाझर फुटला. मायलेकाची ही भेट तिथे उपस्थित असलेल्या साऱ्यांचेच हृदय हेलावून गेली.
टेकडीवरील कोपऱ्याच्या भागात राहणारे सुनील माळी यांची पत्नी आपल्या दीड वर्षांच्या बाळाला, चिंटूला घेऊन हनुमान टेकडीच्या दुसऱ्या टोकाकडे असलेल्या नातलगाकडे गेली होती. तिथून परतत असताना तिने चिंटूला खाली सोडले. सवयीने तो आपल्या मागोमाग येईल, असे तिला वाटले. पण मध्येच कुठे तरी बाळ भरकटले आणि गणपती मंदिरापाशी पोहोचले. मात्र मंदिरातल्या पुजाऱ्यांची सतर्कता आणि मशिदीच्या व्यवस्थापकांची समयसूचकता यामुळे एका बाळाला त्याची आई परत मिळाली, याची चर्चा करतच बघ्यांची गर्दी पांगली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child missing near temple found after announcement made from mosque
First published on: 07-08-2015 at 12:20 IST