दोन महिलांचाही समावेश; लिफ्ट पोहोचली गच्चीवर; ५५ मिनिटांनी सुटका
वसईच्या बाभोळा येथील डी मार्ट या शॉपिंग सेंटरमधील लिफ्ट बंद पडून नऊ जण तासभर आत अडकल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. जादाच्या वजनामुळे लिफ्ट बंद पडल्याचा दावा डी मार्टच्या व्यवस्थापनाने केला आहे.
शनिवारी संध्याकाळी वसईत राहणारे अमोल चव्हाण डी मार्टमध्ये खरेदीसाठी गेले होते. संध्याकाळी सातच्या सुमारास ते लिफ्टमधून खाली येत असताना लिफ्ट खाली येण्याऐवजी तिसऱ्या मजल्यावर जाऊन अडकली. अमोल चव्हाण यांच्या सोबत अन्य एक पुरुष, दोन महिला व एक लहान मुलगा होता. याशिवाय लिफ्टचा ऑपरेटर आणि सेंटरचा एक वायरमनही आत होता. लिफ्ट अडकल्याने पंखे व बल्ब बंद झाला होता. तसेच लिफ्टमध्ये मोबाइलचे नेटवर्क नसल्याने बाहेरच्या लोकांशी संपर्क करण्यात अडचणी येत होत्या, असे चव्हाण यांनी सांगितले.
मुळात तिसऱ्या मजल्यावर लिफ्टची तरतूद नाही. तेथे गच्ची आहे मग लिफ्ट वर गेलीच कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या सोबत असलेला लहान मुलगा आणि महिला रडत होत्या. हवा नसल्याने जीव गुदमरू लागला होता. सुमारे ५५ मिनिटे आम्ही अडकलो होतो. लिफ्टच्या कंपनीचे कर्मचारी आल्यानंतर आमची सुटका करण्यात आली, असे ते म्हणाले.
मंगळवारी चव्हाण यांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पालघर जिल्हा प्रमुख शंकर बने यांच्याकडे तक्रार केली. यानंतर शिवसेनेने डी मार्टच्या व्यवस्थापनाला याबाबत जाब विचारला. आता पुढील आठवडय़ात कंपनीचे अधिकारी आल्यानंतर बैठक बोलावण्यात आली आहे. लिफ्ट बंद पडून ग्राहक जर तासभर अडकत असतील तर ही गंभीर घटना आहे. थोडा विलंब झाला असता तर गुदमरून जीव जाण्याची शक्यता होती, असे बने यांनी सांगितले. आम्हाला जर व्यवस्थापन आणि लिफ्ट कंपनीकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर आम्ही पोलिसात तक्रार करून आमच्या पद्धतीने कंपनीला धडा शिकवू, असे बने यांनी सांगितले.

जादा वजनामुळे लिफ्ट बंद पडली
याबबात डी मार्टशी संपर्क साधला असता लिफ्ट अतिरिक्त वजन झाल्याने बंद पडल्याचे सांगितले. आम्ही लिफ्ट कंपनीला तात्काळ कळवले होते. पण वाहतूक कोंडीमुळे त्यांना यायला उशीर झाला असे साहाय्यक व्यवस्थापक अभिजित सुर्वे यांनी सांगितले. गेल्या ८ वर्षांत पहिल्यांदा अशी घटना घडल्याचे सांगून आम्ही ओटीस या लिफ्ट कंपनीला पत्र दिले आहे. पुढील आठवडय़ात अधिकाऱ्यांना पाहणीसाठी बोलावले आहे. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही तिसऱ्या मजल्यावर सुटकेसाठी दरवाजा तयार करणार असल्याचेही ते म्हणाले. आमचे आत अडकलेल्या ग्राहकांच्या सुटकेसाठी सतत प्रयत्न सुरू होते आणि ४५ मिनिटांत त्यांना बाहेर काढल्याचेही सुर्वे यांनी सांगितले.