ठाणे महानगरपालिकेतर्फे नुकताच गडकरी रंगायतनमध्ये बालनाटय़ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये ठाण्यातील अनेक संस्थांनी बालनाटय़े सादर करून बच्चेकंपनींचे मनोरंजन केले. मधल्या काळात थोडीशी रोडावलेली बालनाटय़ महोत्सवाची परंपरा पुन्हा जोमाने सुरू झाली आहे आणि त्याला बच्चे कंपनीचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारचे महोत्सव ठाण्यातील रसिकांसाठी खास आकर्षण ठरतील.

नाटय़रसिकांची हमखास दाद मिळणारे ठिकाण म्हणजेच ठाणे शहर. याच ठाण्याने मराठी रंगभूमीला उत्तमोत्तम कलाकार दिले. आज अनेक आघाडीचे कलाकार ठाण्यात वास्तव्यास आहेत. गडकरी रंगायतन हे नाटय़ चळवळीचे केंद्रस्थान आहे. याच गडकरी रंगयातनमध्ये हा बालनाटय़ महोत्सव पार पडला. यापूर्वी या महोत्सवात सहभागी होणाऱ्या नाटकांना अत्यल्प मानधन देण्यात येत होते. त्यात घसघशीत वाढ करून महापौर आणि ठाणे महापालिकेने या महोत्सवात सहभागी होणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन दिले आहे. तर सादर होणाऱ्या नाटकांमध्येच स्पर्धा ठेवून त्यांना बक्षीसही जाहीर केले आहे.

या बालनाटय़ महोत्सवामुळे ठाणेकरांना विशेषत: लहानग्यांना दर्जेदार नाटके पाहायला मिळत आहेत. या बालनाटय़ महोत्सवात सहभागी झालेल्या मुलांना प्रशस्तिपत्रक आणि बक्षीस म्हणून ट्रॉफी देण्यात आल्या. ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी एकांकिका महोत्सवही सुरू केला होता. पहिल्याच वर्षी अत्यंत कल्पकपणे या महोत्सवाचे आयोजन विद्यमान स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. मात्र ती परंपरा पुढे खंडित झाली. तो महोत्सव पुन्हा सुरू झाल्यास, त्याच्या जोडीला पुन्हा नाटय़ महोत्सव साजरे झाले तर ठाण्यात नाटक, एकांकिका, बालनाटय़ आणि संगीत (पंडित राम मराठे संगीत महोत्सव) मिळून एक महोत्सवी आठवडा साजरा होऊ  शकतो. ठाण्यात अशा महोत्सवांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यामुळे भविष्यात अशा एखाद्या महोत्सवाचा ठाणे महानगरपालिकेने विचार करायला हवा.

यंदा अखिल भारतीय नाटय़संमेलन ठाण्यात होत आहे. तर ‘टॅग’ ही संस्था अशा सगळ्या विषयांना घेऊन वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम राबवते आहे. अनेक कलाकार ठाण्यात महापालिकेच्या उपक्रमात आनंदाने सहभागी होतात. त्यामुळे महापालिकेने अशा कलाकारांना, काही संस्थांना आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या ठाण्यातल्या रसिकांना सोबत घेऊन जर, असा जंगी महोत्सव करायचा ठरवल्यास भविष्यात ठाणेकरांना दिवाळी ते ख्रिसमस या काळात महोत्सवांची पर्वणीच मिळेल.

खरं तर असे अनेक उपक्रम महापालिका राबवत असतेच. फक्त ते एका छताखाली आणून त्याला एकसंध स्वरूप देण्याची गरज आहे. त्यातून लोकसहभाग वाढेल आणि ठाण्याचा सांस्कृतिक परीघ विस्तारेल. बालनाटय़ांमध्ये जी व्यावसायिक नाटकं सादर होतआहेत त्यातील बहुतांश संस्था या ठाण्यातील आहेत. या संस्थांच्या व्यावसायिक बालनाटय़ांच्या दर्जाबाबत शंका आहेच, पण त्यांची व्यवसायिक गणिते पाहता कदाचित त्यांना आर्थिकदृष्टय़ा परवडणाऱ्या गोष्टी ते करत आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक आणि गुणात्मक मूल्यमापन करीत अशा संस्थांना बक्षिसं आणि मानधन या स्वरूपात महापालिका मदत करतेच आहे तर त्याची व्याप्ती वाढवली तर अधिक दर्जेदार बालनाटय़ बालप्रेक्षकांसाठी उपलब्ध होतील.