जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी नाताळ सणाच्या आनंदापासून वंचित राहू नये यासाठी वसईतील विवा कट्टय़ावर मंगळवारी खास नाताळ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुलांनी नाच-गाणी सादर करत धम्माल मस्ती केली.

‘यंग स्टार ट्रस्ट’तर्फे वसई-विरार शहरात विवा कट्टय़ाचे आयोजन केले जाते. नाताळच्या सणानिमित्त यंदा जिल्हा परिषदेच्या गरीब मुलांसाठी हा सण साजरा करण्याचे ठरविण्यात आले. मंगळवारी सकाळी पापडी येथील हुतात्मा बाळा सावंत उद्यानात हा नाताळ कट्टा रंगला. वसईच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील साडेतीनशे मुले यात सहभागी झाली होती. खास बसने या मुलांना या ठिकाणी आणण्यात आले.

मुलांना ख्रिसमस टोप्या वाटण्यात आल्या. जादूगाराने जादूचे प्रयोग दाखवत मुलांचे मनोरंजन केले. या वेळी सांताक्लॉजने मुलांना भेटवस्तू आणि खाऊ दिला. विविध खेळ, गाणी सादर करत मुलांनी आनंद साजरा केला, असे आयोजक प्रकाश वनमाळी यांनी सांगितले.