News Flash

चिमाजी अप्पा यांचे भाईंदरमधील स्मारक रखडले

समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूपासून मुख्य किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी चिमाजी अप्पांनी ही तजवीज केली.

चिमाजी अप्पा यांचा पुतळा उभारण्यासाठी चबुतरा बांधण्यात आलेला आहे. 

१२ वर्षांपासून अर्धवट स्थितीत; मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

एकीकडे मीरा-भाईंदरचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या घोडबंदर येथील ऐतिहासिक किल्ल्याची दुरवस्था झाली असताना उत्तनजवळच्या चौक गावातील चिमाजी अप्पा यांचे स्मारकही दुर्लक्षित होत आहे. गेल्या बारा वर्षांपासून हे स्मारक अर्धवट स्थितीत आहे.

चिमाजी अप्पा यांनी वसई किल्ल्यावर देदिप्यमान विजयश्री मिळविल्यानंतर त्यांनी वसई खाडीपलीकडील मीरा-भाईंदरच्या हद्दीतील चौक येथे बुरूज व तटबंदी उभारली होती. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूपासून मुख्य किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी चिमाजी अप्पांनी ही तजवीज केली. त्याचे अवशेष आजही या ठिकाणी उपलब्ध आहेत. याच ठिकाणी चिमाजी अप्पा यांचे स्मारक निर्माण करण्याचे नक्की करण्यात आले. त्यासाठी शहराच्या विकास आराखडय़ात महापालिकेने जागा आरक्षित केली. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा महापालिकेकडे हस्तांतरदेखील केली आहे. चिमाजी अप्पांच्या स्मारकासोबतच या ठिकाणी बगीचा, कारंजे तसेच इतर सुशोभीकरणाचे काम करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार या ठिकाणी बगीचा बांधण्याचे काम पूर्ण करण्यात आले. चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी या ठिकाणी सिमेंटकाँक्रीटचा चबुतराही बांधून तयार आहे. मात्र त्यावर पुतळ्याची स्थापना अद्याप करण्यात आलेली नाही. या ठिकाणी स्मारक तयार झाल्यास एक चांगले पर्यटनस्थळ विकसित होणार आहे. स्मारकासमोरच असलेला वसईचा किल्ला, विस्तीर्ण समुद्रकिनारा यामुळे या ठिकाणाला निसर्गदत्त सौंदर्य प्राप्त झाले आहे.

पुतळा बांधण्यासाठी पुरातत्त्व खात्याने महापालिकेला २००४ सालीच परवानगी दिली आहे. चिमाजी अप्पांचा अश्वारूढ पुतळा तयार करण्याचे काम मूर्तिकार विजय शिरवाडकर यांना देण्यात आले असून पुतळ्याच्या आराखडय़ाला कला संचालनालयाकडून मान्यताही मिळालेली आहे. असे असतानाही स्मारकाचे घोडे अद्यापि अडलेलेच आहे. सर्व विभागांच्या परवानग्या मिळाल्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आता हा प्रस्ताव अडकला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे विविध कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगण्यात आले आहे. त्याची पूर्तता महापालिकेकडून सुरू आहे. याच दरम्यान ऐतिहासिक पुतळे उभारणीसाठी परवानगी देणारी समिती स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे समिती स्थापन झाल्यानंतर पुतळ्याचा प्रस्ताव पुन्हा समिती समोर येईल, समितीच्या मान्यतेनंतर जिल्हाधिकारी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहेत. त्यामुळे ही सर्व कार्यवाही पार पाडण्यासाठी आणखी किती काळ जाईल, यावर चिमाजी अप्पांच्या स्मारकाचे भवितव्य अवलंबून आहे.

हे स्मारक लवकरात लवकर व्हावे यासाठी स्थानिक नगरसेविका हेलन जॉर्जी गोविंद यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या ठिकाणी स्मारक विकसित करून शहराच्या ऐतिहासिक सौंदर्यात भर घालावी, अशी मागणी गोविंद यांनी आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 1:34 am

Web Title: chimaji appa memorial stuck
टॅग : Bhayander
Next Stories
1 ग्रामस्थांकडून स्वखर्चाने तलाव
2 ठाणे महापालिका परिसरात ‘नो पार्किंग’
3 वाहतूक दंडाची योजना पोस्टाच्या खर्चापायी लांबणीवर
Just Now!
X