23 November 2017

News Flash

चिंचोटी, तुंगारेश्वरमध्ये पर्यटकांचा ओघ

कामण फाटय़ावरून गेल्यावर लागणारा चिंचोटी धबधबा हे पर्यटकांचे दुसरे आवडते ठिकाण

वैष्णवी राऊत, वसई | Updated: July 15, 2017 2:14 AM

सप्ताहअखेरीस धबधब्यांवर चिंबसहली

पावसाळा सुरू झाला की वसईसह मुंबई-ठाण्यातील पर्यटक तुंगारेश्वर आणि चिंचोटी येथील धबधब्याच्या ठिकाणी सहलीसाठी येतात. यंदाही पर्यटकांची दोन्ही पर्यटनस्थळी गर्दी होत असून सप्ताहअखेरीस दोन्ही स्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत.

वसई तालुक्यातील चिंचोटी आणि तुंगारेश्वर धबधबे पर्यटकांचे खास आकर्षण! उंचावरून पडणाऱ्या दुधाळ जलप्रपाताखाली मनसोक्त भिजायचे आणि वर्षां सहल साजरी करायची या हेतूने या दोन्ही ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाली आहे. वर्षां सहलीबरोबरच जंगल सफरीचा अनुभव मिळत असल्याने अनेक हौशी पर्यटक, दुचाकीस्वार, छायाचित्रकार, पक्षी-प्राणीप्रेमी आणि निसर्गप्रेमी येथे येतात. मुंबई-अहमदाबाद महामार्गापासून आणि वसई रोड रेल्वे स्थानकापासून अगदी जवळच असल्याने पर्यटकांची पसंती या भागाला असते. यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने गैरहजेरी लावल्याने येथील धबधबे उपलब्ध नव्हते, परंतु गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने येथे पर्यटकांनी गर्दी केली आहे. सध्या तरी धबधब्यांचे आकर्षण असलेल्या तरुणाईची पावले येथील नदी, नाले ओलांडून सफरीचा आनंद घेत आहेत.तुंगारेश्वर येथे तब्बल सात लहान-मोठे धबधबे पार करून जाता येते. धुक्याने भरलेली वाट, हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्या, उंचावरून कोसळणारा धबधबा यांचा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांनी येथे गर्दी केली आहे. कामण फाटय़ावरून गेल्यावर लागणारा चिंचोटी धबधबा हे पर्यटकांचे दुसरे आवडते ठिकाण. या ठिकाणी पोहोचताना हिरव्यागार झाडाझुडपातून दाटीतून जावे लागते. या मार्गावर विलोभनीय धबधबे पाहावयास मिळतात.

खबरदारी घेण्याचे आवाहन

तुंगारेश्वर आणि चिंचोटी येथे वर्षां सहलीचा आनंद घेत असताना खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरुणांचा तुंगारेश्वर येथील धबधब्याखालील डोहात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या दोन्ही धबधब्यांच्या ठिकाणी निसरडय़ा वाटा, दलदल असून नवीन पर्यटकांना त्याचा अंदाज नसतो. त्यामुळे दुर्घटना घडतात. ही दोन्ही ठिकाणी जंगलात असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

First Published on July 15, 2017 2:13 am

Web Title: chinchoti waterfall tungareshwar vasai tourism