वैशिष्टय़पूर्ण चव आणि दर्जा यामुळे अवघ्या महाराष्ट्रात कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय ठरलेले पुण्यातील सुप्रसिद्ध चितळे उद्योग समूहाची मिठाईची दालने आता आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन १२ तास खुली राहणार आहेत. दुपारची वामकुक्षी या पुणेरी स्वभावाचा पगडा तेथील बाजार व्यवस्थेवरही पडला असून त्यामुळेच शहरातील अनेक दुकाने दुपारी १ ते ४ बंद असतात. चितळ्यांची मिठाईची दुकानेही त्याला अपवाद नाहीत. त्यावरून समाजमाध्यमात विविध प्रकारचे विनोदही प्रचलीत आहेत; मात्र आता काळाप्रमाणे बदलत दुपारीही दुकाने खुली ठेवण्यात येतील, असे दस्तुरखुद्द चितळे कुटुंबियांनी ठाण्यात ‘इंद्रधनू’ संस्थेने आयोजित केलेल्या प्रकट मुलाखतीदरम्यान जाहीर केले. सुप्रसिद्ध संवादक आणि पक्के पुणेकर असलेल्या सुधीर गाडगीळ यांनी ‘चितळे’ची चित्तरकथा रंगवली.

दूध काढण्यासाठी आजोबांना पहाटे लवकर उठावे लागत असे. कर्मचारीही सकाळी लवकर उठून दुधाबरोबरच पेपर लाईन टाकत.

त्यामुळे दुपारी विश्रांती घेण्याची प्रथा पडली; मात्र आता त्याची आवश्यकता नाही. त्यामुळे लवकरच दुपारच्या विश्रांतीला सुट्टी देणार आहोत, असे इंद्रनील चितळे यांनी यावेळी जाहीर केले.   सध्या चितळे उद्योग समूहामध्ये २२५ उत्पादने बनवली जातात. भारतात पहिल्यांदा खवा बनविण्याचे यंत्र भिलवणीमध्ये बसविले. चितळे उद्योग समुहामुळे  ‘पाऊच मिल्क’ पुण्यात प्रथम सुरू झाले आहे. ग्राहकांना उत्तम आणि वाजवी दरात पदार्थ देणे हा आमचा उद्देश असतो. सध्या चितळे समूहाच्या २०० शाखा आहेत. २००७ नंतर अधिक शाखा वाढविल्या. पुण्यातील कंपनी व दुकानांमध्ये मिळून १५०० तर पुण्यातील कंपनीमध्ये ४५० कर्मचारी काम करीत असल्याची माहिती चितळे यांनी दिली.  ग्राहकांच्या मागणीनुसार आता लवकरच ताकही  सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

‘चितळेंकडे काम केल्यावर चांगली मुलगी मिळते’

‘आमच्याकडच्या डेअरीमध्ये पाच जागा असतील तर पाच हजार अर्ज येतात. या मागचे मी कारण शोधले तर चितळेंकडे काम केल्यावर चांगली मुलगी मिळत असल्याचे उत्तर मिळाले.‘ इंद्रनील चितळे यांनी हा किस्सा सांगताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. काही कर्मचाऱ्यांच्या तीन पिढय़ा काम करीत आहेत. आमच्या व्यवसायाचा पॅटर्न आता बदलत चालला आहे, असे इंद्रनील यांनी सांगितले. दिवाळीला घरचे पदार्थ खाता की दुकानातून आणता हा प्रश्न गाडगीळ यांनी विचारला असता, विश्वास चितळे म्हणाले की, घरचा लाडू चिवडा चांगलाच पण चेंज म्हणून दुकानातले पदार्थही आवडतात. गाय हे शेतकऱ्यांसाठी एटीएम आहे. आज चारा दिला की उद्या दूध देते.