News Flash

वसईतील ख्रिस्तायण ; पारंपरिक विवाह सोहळे  : भाग – २

कोळी विवाह सोहळे रविवारी पार पडतात, पण सोहळ्यांची सुरुवात ४ दिवस आधीपासूनच होते.

Traditional Wedding Ceremony
ख्रिस्ती विवाह सोहळ्यातील पद्धती

साधारणत: अकराव्या शतकापासून सुरू झालेल्या विवाह परंपरेला, भारतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हणतात की, लग्नानंतर माणसाला बुद्धी-प्रतिभा, जाणिवा-नेणिवा, तर्क-वितर्क या गोष्टी ठळकपणे समजू लागतात. विवाह सोहळ्यांची गंमत मात्र वेगळीच असते. सांस्कृतिक किंवा पारंपरिक विधींमुळे लग्नाचा समारंभ होतो आणि सगळ्यांना मज्जा करायला मिळते. सध्या ‘इव्हेंट’चे स्वरूप आलेले विवाह समारंभ वसईत पारंपरिकरीत्या विविध प्रकारे साजरे केले जातात. या ख्रिस्ती विवाह सोहळ्यातील पद्धती आणि परंपरा जाणून घेऊ या.

सामवेदी (कुपारी) विवाह सोहळे

कुपारी विवाह सोहळ्यांना, काही गावकरी आणि जवळच्या नातेवाईकांना बोलावून मंडप घालण्यापासून सुरुवात होते, तसेच लग्नाच्या दोन दिवस आधी शेजारील महिला, नातेवाईक मिळून तांदूळ आणि उडिदाचे पीठ आंबण्यासाठी ठेवतात, रात्री आंबल्यावर त्याचे वडे तळतात. यास ‘पीठ घालणे’ आणि ‘तळण काढणे’ असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी हे गावात वाटले जातात. वाजंत्री आल्यानंतर गावकऱ्यांना जेवण दिले जाते, त्यानंतर बँडच्या तालावर नृत्य केले जाते, नंतर दुसऱ्या दिवशी वाजंत्रीसह जोडप्याने गावच्या विहिरीवरून पाणी आणतात तेव्हा ‘आसरा आसरा श्ॉवाळ भरा निताळ, पानी जॉ भरीतॅ तिशी भावजय बाय’ असे गीत स्वच्छ पाणी आणण्यासाठी गायले जाते. मग ते घरातील चुलीवर गरम करून त्यात चिमूटभर हळद मिसळतात. मंडपात पाट ठेवून त्यावर वधू किंवा वरास बसवले जाते. त्यांच्या शरीराला नारळाचे दूध लावून विधीपूर्वक स्नान घातले जाते. याच दिवशी आजूबाजूचे लोक मिळून मंडपाला केळीचे फूल असलेले खांब लावतात आणि आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. नंतर २००-३०० वडे टोपलीत भरून सासरी पाठवले जातात, ज्यास ‘सासुरे’ असे म्हणतात. मग ‘आयेज’ हा अलंकार पाठवणीचा विधी होतो. ज्यात सोनाराला घेऊन सासरची मंडळी बँडसह वाजतगाजत वधू पक्षाकडे जातात. मुलीला पाटावर बसवून ते दागिने विधीपूर्वक दिले जात असत. मामा-मामी बँडबाजा यांच्यासह साडी-चोळी घेऊन येतात. त्याच्यासह न्हावी (मालोया) येत असे आणि तो वराची दाढी करून मोहाविधी संपन्न करत असे. त्याचबरोबर वधूपक्ष वाजंत्रींसह येऊन लग्नाची अंगठी मुलाला देत असे.

लग्नाच्या दिवशी वराला राजेशाही टोपी, सरदारी कोट, बूट, सोनसाखळी आणि अंगठी परिधान केले जाते, तर वधूला पितांबरी भरजरी साडी-चोळी, सोन्याची पोत, फुलगाबे, बांगडय़ा, अंगठी इतर अनेक दागिने परिधान करत असे. चर्चमध्ये मुख्य विवाह पार पडल्यानंतर त्यांना आशीर्वाद तसेच ख्रिस्तप्रसाद दिला जातो. मग वरात काढली जाते, जी वधुच्या घरी जाऊन तेथील आळीच्या वेशीजवळील तोरण उतरवून मग ती पुढे जाते. मग जेवण आटोपले की पुन्हा संध्याकाळी वरात निघते. मग दुसऱ्या दिवशी वधूला चुडे भरण्याचा कार्यक्रम केला जातो. वधूपक्ष दोघांचेही बोलावणे करतात.

सामवेदी कुपारी संस्कृतीचे अभ्यासक असलेले नंदाखाल गावचे जीम रॉड्रिग्ज सांगतात की, ‘‘प्रत्येक विधी, प्रसंगासाठी लोकगीते आहेत, साधारण १०० वर्षांपासूनची परंपराच आहे, तसेच विवाहातील सांस्कृतिक विधी हे वर्षांनुवर्षे समाजाने टिकवून ठेवलेले आहेत.’’

कोळी विवाह सोहळे

कोळी विवाह सोहळे रविवारी पार पडतात, पण सोहळ्यांची सुरुवात ४ दिवस आधीपासूनच होते. स्वयंपाकासाठी लागणारे तांदूळ, डाळी, कडधान्ये गावातील विहिरवर मिरवणुकीसह नेऊन ते स्वच्छ धुतले जातात. नंतर दुसऱ्या दिवशी वडे बनवण्यासाठी सामुहिक पीठ मळणी केली जाते. तांदुळाचे पीठ एका मोठय़ा लाकडी भांडय़ात ठेवतात. पुरुष मंडळी प्रार्थना करून कामाला सुरुवात करतात. मग या वडय़ांचे वाटप होते. मग पुढच्या दिवशी वारणी म्हणजेच बँडसह मामा-मामींना, धर्म माता-पितांना हळदी स्नानासाठी बोलावले जाते. हा कार्यक्रम झाला की, मामाकडून उंबराची फांदी तोडण्यात येते. लग्नाया आदल्या दिवशी कोळीवाडय़ात लग्न घरात बँड वाजत असे. मुख्य दिवशी सकाळी विहिरीतून वधू-वरांसाठी पाणी आणले जाई, नंतर ते चर्चमध्ये मुख्य विधीसाठी जातात. यावेळी पारंपरिकरीत्या लुगडे आणि सुरका परिधान केले जात असे, परंतु हे मागे पडत आता वर सूटबूट, टाय आणि वधू पायघोळ झगा घालते. वधूला सोन्याच्या बांगडय़ा, हार, गोलमाळ, कानपट्टे तर वराला सोनसाखळी, अंगठी इत्यादी दागिने बनवले जातात. लग्नामध्ये वाव, घोळमासा, शिंगाळा इत्यादी माशांपासून बनवलेले प्रकार, मासे चिली हे पदार्थ आवर्जून बनवले जातात.

वसईच्या पाचूबंदर येथील स्थानिक तरुण कोळी असलेले मिल्टन सौदिया सांगतात की, ‘‘कोळी विवाह सोहळे हे जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान होतात. याचे वैशिष्टय़ म्हणजे ऐक्य टिकवण्यासाठी आणि व्यवसायाला अनुरूप म्हणून सामूहिक विवाह सोहळे केले जातात. गावात एकत्र एक दिवस ठरवून चर्चमध्ये सांगून हा सोहळ पार पाडतात.’’

ख्रिस्ती हा एकच धर्म असला तरी वसईच्या विविध भागात विविध ख्रिस्ती समाजात ते वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात.

दिशा खातू  @Dishakhatu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2017 3:14 am

Web Title: christian community traditional wedding ceremony part 2
Next Stories
1 मद्याच्या अवैध वाहतुकीला लगाम
2 पोलिसांच्या दक्षतेमुळे ज्येष्ठ नागरिकाचे मतपरिवर्तन
3 पाऊले चालती.. : नाही रम्य तरीही..
Just Now!
X