08 March 2021

News Flash

वसईतील ख्रिस्तायण : ख्रिस्ती समाजातील ‘अलम्’

ख्रिस्ती समाजातील लहान मुली आवडीने केसात चांदीचे गुलाबफूल लावत.

वसईतील ख्रिस्ती समाजाच्या वैविध्यपूर्ण परंपरेत दागिन्यांचा खास समावेश आहे. काळानुरूप दागिन्यांची परंपरा येथील समाज जपत आला आहे. दागिन्यांवर लोकगीतेही रचण्यात आली आहेत. दागिन्यांचे हे वैविध्य आणि त्याची रचना वसईतील ख्रिस्ती समाजाच्या कलाप्रेमाची साक्ष देत आहे.

अलम् अर्थात भूषण होय. जे भूषित केले जातात त्यांस अलंकार (आभूषणे) असे संबोधले जाते. दागिने हे सौंदर्यवृद्धीसाठी परिधान केले जातात. दागिने हे संस्कृती आणि परंपरेतील एक भाग आहेत. बदलत्या जीवनशैलीनुसार दागिन्यांतही बदल होत गेले. भारतातील प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या जडणघडणीचे दागिने पाहायला मिळतात. हे दागिने त्या प्रांतातील समाजाचे वैशिष्टय़ असते. वसईतील ख्रिस्ती समाजाच्या अलंकारांचीदेखील एक पंरपरा आहे.

ख्रिस्ती समाजातील लहान मुली आवडीने केसात चांदीचे गुलाबफूल लावत. त्यांच्या हातापायांत चांदीचे वाळे घातले जात होते. मुलीचे वैवाहिक जीवन सुरू झाले की तिच्या पायातील वाळे काढले जात असत. मग त्याची जागा चांदीचे पैंजण घेत असे. हातात वाळ्यांसह दोन-चार चांदीच्या किंवा सोन्याच्या बांगडय़ा घालण्यात येत होत्या. गळ्यात मण्यांचा सर असे. दोन-तीन चांदीच्या अंगठय़ा घातल्या जात, त्यामध्ये एका चांदीच्या अंगठीला घुंगऱ्या असे, त्याला कौमुदी असे म्हणतात. तसेच कानात सोन्याच्या वाळ्या घातल्या जात होत्या. काही वेळा चार-पाच सोन्याच्या लहान वाळ्यादेखील घालण्यात येत होत्या.

लग्न ठरल्यानंतर, वधू आणि वर पक्षाची बैठक होत असे. किती तोळे दागिने बनवायचे हे त्यात ठरविले जात होते. त्यानुसार लग्नाच्या आधी सासरकडून वाजंत्रीसह गाजत वरात येत असे. ज्यास ‘आयेज’ किंवा ‘सारा’ असे म्हटले जाते. या वेळी मुलीसाठी बनवलेले दागिने सासरचे लोक नक्षीदार पेटीतून घेऊन येतात. याप्रसंगी गाण्यात येणारी दागिन्यांवरील लोकगीते ही प्रसिद्ध आहेत.

‘सोनियासॉ कंडुलॉ, आयोजान भरीयेलॉ

तिशा सासऱ्यान धाडियेलॉ त्याशा ऑबायेला’

(कादोडी भाषेतील लोकगीत) याचा अर्थ दागदागिन्यांनी भरलेले सोन्याचे कंडुले, सासऱ्याने आपल्या सुनेसाठी पाठविले.

हे सर्व दागिने, भेटवस्तू गावातील प्रमुखांसोर तपासले जात असे. येथील स्त्रियांचे ठेवणीतले खास दागिने असत. ज्यात गळ्यातील, हातातील दागिन्यांसह केश अलंकारही असे. केश अलंकारांमध्ये गुलाबफूल, ढापणी, केतक, कुळूक, जोडले, फेरवा इत्यादी प्रकारचे असत. हे चांदीचे बनवले जात होते. त्यावर सोन्याचे पाणी चढवले जात होते. केसाच्या अंबाडय़ावर लावता येण्यसाठी त्याला काटा (चांदीची टोकदार पट्टी) असे. ही फुले दोन इंच व्यासाची विविध आकारांत नक्षीदार कोरलेली असतात. आंजेलकाडी या प्रकारात चार ते पाच लहान फुले लावलेली असत. हा दागिना दर्दी सोनाराकडून घडवून घेतला जात असे.

गळ्यातील दागिन्यांमध्ये तर पुतळ्यांचा हार, दुलेडी, वजट्रीक, ठुशी, बोरमाळ (जवमाळ, जोंधळामाळा), डोळे, पदर, कोत (पोवळ्यांचा हार), पाशीहार, पेरस, अरुल्याचा हार, शापिलीचा हार, पोत, शिरण (हिराण) इत्यादी प्रकारचे पारंपरिक दागिने होते. पदर हा रोजच्या वापरात घालण्यात येणारा सोन्याचा दागिना, त्यात मणीदेखील गुंफलेले असत. वृद्ध किंवा विधवा स्त्रिया सोन्याचे चौकोनी मणी, गोल मणी, पुतळ्यांपासून बनविलेला डोळा हा दागिना घालत, तसेच त्या छोटे पोवळ्यांचे शिरणही घालत. काही लोक त्या शिरणातील काळे मणी काढून मग ते घालत असे.

पोत आणि शिरण हे स्त्रियांचे सौभाग्याचे लेणे होते. हा सोन्याचा दागिना नववधूला लग्नात दिला जातो. पोत या सोन्याच्या दागिन्यात काळे मणीदेखील वापरले जात होते. कोत किंवा पोवळ्यांचा हार हा सोन्याचे मणी आणि पोवळे वापरून साधारण एक फूट लांबीचा हार बनवत असे. त्याला मध्यभागी क्रुस किंवा रेशमी गोंडा असे. अरुल्याचा हार हा सुंभाच्या पिळासारखा असे. शापिलाचा हारला सोन्याची साखळी आणि त्याला मध्यभागी छापफुलाची प्रतिमा असे.

इतर ठेवणीतील गळ्यातील दागिने म्हणजे, पुतळ्यांचा हार हा गोलाकार आकारात पाऊण इंच व्यासाचा असे त्याला बारा सोन्याचे पुतळे मण्यांसह लाल दोऱ्यात ओवलेले असत. त्याला मध्यभागी नक्षीदार मोठा मणी किंवा पान असे. दुलेडी हा प्रकार षट्कोनी किंवा अष्टकोनी सोन्याच्या मण्यांचा बनविलेला असे. त्याला मध्यभागी मोठे पान असे. अशाच प्रकारचा दोन किंवा तीन पदरी बारीक धण्याच्या आकाराचा मण्यांचा हार जो सणसुदीला वापरला जातो त्याला पेरस असे म्हणतात. अर्धा ते पाऊण व्यासात तीन ते चार सोन्याचे मणी ओळीने लावून वजट्रीक बनविली जाते. हा दागिना कंठाभोवती घातला जातो. ठुशीदेखील गळ्याभोवती घातली जाते. सोन्याचे पोकळ मणी गोलाकार भरगच्च लावलेले असतात. लग्नकार्यात हा दागिना वापरला जातो. ठुशी हा महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. बोरमाळ ही बोर, जव किंवा ज्वारीच्या आकाराच्या सोन्याच्या मण्यांना, सोन्याच्या साखळीत गुंफून बनवण्यात येतो. पाशीहार हा सर्व दागिन्यांत श्रेष्ठ समजला जातो. साधारणत: आठ इंच लांबीची जाळीच्या बाजूला सोन्याच्या पुतळ्यांची रांग असे. त्यावर नक्षीकाम केलेले असे. हा हार धनिक स्त्रियांच्या गळ्यात दिसे. लग्नकार्यात हा दागिना उसना घेऊनही वापरला जात होता. हा दागिना पाच तोळ्याहून अधिक सोन्यात बनवला जात असे. हा हार पारशी समाजातून आला असावा, असेही वसईतील अभ्यासकांचे म्हणणे आहे.

स्त्रिया हातात दंडकडे, चुडे, बांगडय़ा, पाटल्या, अंगठी असे दागिने वापर होत्या. दंडकडे आणि चुडे हे चांदीचे बनवलेले असत. चुडे हे लग्नात दिले जाई. हे चुडे विधवा झाल्यावर घातले जात होते. एक ते दोन सोन्याच्या बांगडय़ा रोजच्या वापरात असत. लग्नात मुलीला चार-सहा माहेरच्या बांगडय़ा दिल्या जात, त्यामध्ये एक मोठी नक्षीदार बांगडी बनवण्यात येत असे. पाटल्या या अर्धा इंच रुंदीच्या ज्यावर नक्षीदार पट्टा असतो. अंगठय़ा विविध प्रकारच्या होत्या, परंतु लग्नात पतीने दिलेली सोन्याची अंगठी नेहमी घालण्यात येत होती.

वसईतील स्त्रिया कानामध्ये कापोटी, कराब, मुगडय़ा, वाळ्या इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करत असे. कानाच्या पाळीवर घालतात त्यास कापोटी म्हणतात, त्याला सोन्याच्या साखळ्या जोडलेल्या असत, ज्या केसात लावण्यात येत. हे सोन्याचे कानातले मोठय़ा गोल आकारातले त्यावर लाल किंवा गुलाबी रंगाचा खडा बसवण्यात येत असे. सोन्याच्या छोटय़ा कर्णफुलांना कराब म्हटले जाते. साध्या वाळ्या, घुडांच्या वाळ्या आणि धरण्या हे वाळ्यांचे तीन प्रकार आहेत. यापैकी धरण्या हे सौभाग्याचे प्रतीक होते. या वाळ्या लग्नात मुलीच्या कानात घातल्या जात असे. वाळ्या वजनाने जड असत. या अशा प्रकारे कानात घातल्या जात की सहज कोणीही त्या काढू शकत नसे. कारण अगदी शेवटच्या प्रसंगी किंवा खूपच आजारी पडल्यास पैशांची चणचण भासल्यावर हा दागिना काढून वापरण्यात येई.

वसईतील ख्रिस्ती समाजाने दागिन्यांना अधिक महत्त्व दिलेले दिसते. अंगठी, सदऱ्याची बटणे, खिशातले घडय़ाळ, सोन्याची कंठी, गोफ किंवा तोडा इत्यादी प्रकारचे पारंपरिक दागिने वसईतील पुरुषांचे होते. लग्नप्रसंगी मुलाला अंगठी मिळे जी तो नेहमी वापरत असे. त्याचबरोबर इतर अंगठय़ाही पुरुषाजवळ असत. आर्थिदृष्टय़ा सधन असलेले लोक सोन्याच्या साखळीत (तारेत) किंवा गोंडय़ाने बांधलेल्या दोऱ्यात विविध आकारांतील सोन्याची किंवा चांदीची चार-पाच बटणे जोडत असे. ही बटणे सदऱ्याला लावली जात होती. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या कोटाला खिशातले घडय़ाळ असे, ज्याला सोने, चांदी किंवा दोऱ्याची साखळी असे. पुरुष सोन्याची कंठी मंगलप्रसंगी वापरत असे.

disha.dk4@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 2:08 am

Web Title: christian society in vasai christian community traditional jewellery
Next Stories
1 अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आईला मारहाण
2 महिलेला ‘छम्मकछल्लो’ म्हणाल तर तुरुंगात जाल
3 ठाण्यात पोलिसांकडून बारमालक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण
Just Now!
X